Ajit Pawar Budget Record: महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते त्यांच्या भाषणांमुळे ओळखले जातात, तर काही त्यांच्या कामामुळे. अजित पवार हे दुसऱ्या प्रकारात मोडतात. “घोषणांपेक्षा अंमलबजावणी” ही त्यांची ओळख राज्याच्या अर्थकारभारात ठसठशीतपणे दिसून आली आहे. तब्बल 11 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला असून, या बाबतीत ते राज्याच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
राज्यात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम विदर्भातील ज्येष्ठ नेते बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या नावावर आहे. त्यांनी 13 वेळा अर्थसंकल्प मांडला होता. अजित पवार 11 वेळा अर्थसंकल्प सादर करून या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, त्यांना अर्थमंत्रीपदाचा कार्यकाल पूर्ण करता आला असता, तर हा विक्रमही त्यांच्या नावावर जाण्याची शक्यता होती.
अजित पवार यांचा राजकीय प्रवास चार दशकांहून अधिक काळाचा आहे. विविध राजकीय परिस्थितीत त्यांनी वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत काम केले. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या वेगवेगळ्या काळातील नेतृत्वाखाली त्यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांची कार्यपद्धती वेगळी राहिली आहे. सकाळी लवकर मंत्रालयात पोहोचून फाईल्सचा निपटारा करणे, अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणे आणि निर्णय प्रक्रियेत स्पष्टता ठेवणे, यामुळे ते ‘राज्याच्या तिजोरीचे खंदे रक्षक’ म्हणून ओळखले जातात. जलसंपदा, कृषी, ग्रामविकास, ऊर्जा आणि अर्थ ही खाती त्यांनी हाताळली असून प्रत्येक खात्यात त्यांनी ठसा उमटवला आहे.
2025 चा अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी ‘विकसित महाराष्ट्र’ हे ध्येय समोर ठेवले होते. या अर्थसंकल्पात सामाजिक कल्याण योजनांवर विशेष भर देण्यात आला. लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मानधनात वाढ झाली नसली, तरी योजना सातत्याने सुरू ठेवण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
या अर्थसंकल्पादरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचाही उल्लेख केला. जयंत पाटील यांनी सलग 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला असून, अजित पवार यांनी तो विक्रम मोडताना त्यांचे जाहीर कौतुक केले होते. जयंत पाटील या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर सुशीलकुमार शिंदे यांनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.
राजकीय मतभेद असले तरी अर्थकारभाराच्या बाबतीत अजित पवार यांची कार्यक्षमता मान्य केली जाते. कठोर निर्णय, शिस्तबद्ध कामकाज आणि अंमलबजावणीवरचा भर यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या अर्थराजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.