पुणे: गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून भाजपकडून लक्ष्य ठरलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी थेट ‘बॅटिंग’ करत जुन्या युती सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. 1999 पूर्वीच्या भाजप शिवसेना युती सरकारने सिंचन प्रकल्पांच्या किमती वाढवून कशा प्रकारे ‘पार्टी फंड’ गोळा केला, असा खळबळजनक दावा पवारांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अजित पवारांनी पुण्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेचे उदाहरण देत हा गौप्यस्फोट केला. 1999 मध्ये जेव्हा राज्यात काँग्रेस - राष्ट्रवादीचे सरकार आले आणि जलसंपदा खाते त्यांच्या ताब्यात आले, तेव्हा एक महत्त्वाची फाईल त्यांच्या समोर आली. या प्रकल्पाची किंमत कागदोपत्री 310 कोटी रुपये दाखवण्यात आली होती. मात्र, चौकशीअंती धक्कादायक वास्तव समोर आले. मूळ किंमत केवळ 200 कोटी असताना तब्बल 110 कोटींचा अतिरिक्त बोजा या प्रकल्पावर लादण्यात आला होता.
हेही वाचा: Pune Election 2026: पुण्याच्या राजकारणात खळबळ, मतदानाला काही तास उरले असतानाच धंगेकरांचा 'व्हिडीओ बॉम्ब', वाचा सविस्तर
पवारांच्या दाव्यानुसार, त्यावेळच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही वाढीव किंमत का केली, याचे कारण स्वतः कबूल केले होते. “आधीच्या सरकारने 100 कोटी रुपये ‘पार्टी फंडा’साठी मागितले होते. त्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढवावी लागली. त्यात आम्ही अधिकाऱ्यांनीही आमचे 10 कोटी वाढवले आणि 200 कोटींचा प्रकल्प थेट 310 कोटींवर गेला,” असे त्या अधिकाऱ्याने सांगितल्याचे अजित पवारांनी जाहीर सभेत स्पष्ट केले. त्यावेळी सिंचन खाते भाजपकडे असल्याने या आरोपांचा थेट रोख भाजपवर आहे.
या गंभीर आरोपांनंतर विरोधकांकडूनही तात्काळ प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी यावर आपली बाजू मांडली. “1999 मध्ये मी अर्थमंत्री होतो. अशा कोणत्याही निर्णयाची मला माहिती नाही,” असे खडसे यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याचवेळी त्यांनी अजित पवारांना प्रतिसवालही केला. “जर ही माहिती अजित पवारांकडे होती, तर त्यांनी गेल्या 25 वर्षांपासून हे वास्तव का लपवून ठेवले?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी या दाव्याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे.
अजित पवारांनी पुढे आणखी खळबळजनक इशारा दिला. “ती फाईल आजही माझ्याकडे सुरक्षित आहे. जर ती फाईल मी त्यावेळी बाहेर काढली असती, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा हाहाकार माजला असता,” असे ते म्हणाले. अनेक वर्षांपासून सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचा सामना करणाऱ्या पवारांनी आता थेट पुराव्यांची भाषा केल्याने, येत्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा ‘कलगीतुरा’ रंगण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आता चांगलाच तापणार, हे निश्चित मानले जात आहे.
हेही वाचा: Mumbai Local Train: आता घामाघूम होवून प्रवास करणं विसरा; हार्बर मार्गावरही धावणार एसी लोकल; काय आहे वेळापत्रक?