मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी, विशेषतः हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली AC लोकल अखेर 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हार्बर मार्गावर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुख्य मार्गावर AC लोकलच्या सुखकर प्रवासाचा आनंद घेणाऱ्या प्रवाशांनंतर, आता हार्बर मार्गावरील प्रवाशांचेही ‘गारेगार’ प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, चेन्नईहून मुंबईत दाखल झालेली नवीन वातानुकूलित लोकल ट्रेन प्राधान्याने हार्बर मार्गावर चालवली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाला Central Railway मुख्यालयाने मंजुरी दिली असून, सोमवार ते शनिवार या काळात दररोज एकूण 14 फेऱ्या (7 अप आणि 7 डाऊन) चालवण्यात येतील. यामुळे नवी मुंबई ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या नोकरदारांना उन्हाच्या चटक्यांपासून आणि गर्दीच्या उकाड्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे.
असे असेल AC लोकलचे वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेतही या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
पहिली फेरी: पहाटे 4 वाजून 15 मिनिटांनी वाशी ते वडाळा रोड
डाऊन मार्गावरील पहिली फेरी: पहाटे 5 वाजून 6 मिनिटांनी वडाळा रोड ते पनवेल
सकाळची महत्त्वाची फेरी: सकाळी 9 वाजून 9 मिनिटांनी पनवेल ते CSMT
संध्याकाळची महत्त्वाची फेरी: सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी वडाळा रोड ते पनवेल
दिवसातील शेवटची फेरी (अप): सायंकाळी 6 वाजून 37 मिनिटांनी पनवेल ते CSMT
दिवसातील शेवटची फेरी (डाऊन): रात्री 8 वाजता CSMT ते पनवेल
विशेष म्हणजे, या AC लोकल फेऱ्या फक्त सोमवार ते शनिवार या काळातच चालवण्यात येतील. रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी या वेळेत नेहमीच्या सामान्य (Non-AC) लोकल धावतील, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
हार्बर मार्गावर यापूर्वी 2021 मध्ये AC लोकल सुरू करण्यात आली होती, मात्र कमी प्रतिसादामुळे ती बंद करण्यात आली होती. परंतु, आता प्रवाशांची वाढती मागणी आणि अत्याधुनिक सोयीसुविधा लक्षात घेता, रेल्वेने पुन्हा एकदा हा निर्णय घेतला आहे. CSMT ते पनवेल या सुमारे 60 किलोमीटरच्या पट्ट्यात आता प्रवाशांना प्रीमियम आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.