Friday, February 13, 2026 10:00:47 AM

Ajit Pawar Funeral: भावाच्या निधनाने सुप्रियाताईंचा काळजाचा तुकडा हरपला; स्वतः सावरत सुनेत्रा वहिनी आणि भाच्यांसाठी बनल्या 'ढाल'

शासकीय इतमामात अंत्यसंस्काराच्या वेळी जनसागर उसळला. कठीण प्रसंगी सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबाचा खंबीर आधार बनल्या.

ajit pawar funeral भावाच्या निधनाने सुप्रियाताईंचा काळजाचा तुकडा हरपला स्वतः सावरत सुनेत्रा वहिनी आणि भाच्यांसाठी बनल्या ढाल

बारामती: कालपर्यंत ज्यांच्या शब्दाने प्रशासन हलायचे, ज्यांच्या एका आवाजावर अख्खी बारामती धावून यायची आणि ज्यांच्या नजरेतील जरब पाहून भल्याभल्यांची बोलती बंद व्हायची, महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकप्रिय नेते, अजितदादा आज अनंतात विलीन झाले आहेत. बुधवारी, 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे केवळ पवार कुटुंबच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

काळजाचा ठोका चुकवणारा तो 'ब्लॅक वेडनेस्डे'

नेहमीप्रमाणे धावपळीचे आयुष्य जगणारे दादा बुधवारी सकाळी मुंबईहून चार्टर्ड विमानाने बारामतीकडे निघाले होते. मात्र, बारामतीच्या आकाशात विमानाने नियंत्रण गमावले आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. विमान कोसळताच झालेल्या स्फोटाने केवळ विमानच नाही, तर लाखो कार्यकर्त्यांच्या आशा-आकांक्षाही जळून खाक झाल्या. या भीषण अपघातात विमानातील अजित दादांसह पाचही जणांचा अंत झाला.

हेही वाचा: Praful Patel : "आता आपली भेट होणार नाही," अजितदादांचा 'तो' शेवटचा फोन ठरला अखेरचा संवाद

अंत्यसंस्कारावेळी राज्यातील विविध नेत्यांची उपस्थिती 

अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी राज्यातील विविध पक्षांचे नेते, ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्वे, प्रशासकीय अधिकारी, कार्यकर्ते आणि लाखो नागरिक उपस्थित होते. अजित पवारांना अखेरची मानवंदना देण्यासाठी बारामतीत जनसागर उसळला होता. “दादा, पुन्हा या,” अशा भावना व्यक्त करणारे नारे, अश्रूंनी ओलावलेले डोळे आणि शांत झालेले चेहरे संपूर्ण परिसर शोकमय वातावरणात बुडालेला दिसत होता.

या अंत्यसंस्कार सोहळ्यावेळी पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, राजेंद्र पवार, यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबाने अश्रूंनी डोळे भरून अजित पवारांना अखेरचा निरोप दिला. कुटुंबीयांचे दुःख पाहून उपस्थितांचेही अंतःकरण जड झाले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शोक, शांतता आणि न बोलता व्यक्त होणारी वेदना स्पष्ट दिसत होती.

सुप्रियाताईंच्या रूपाने कुटुंबाला मिळाला 'आधार'

अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंब कोसळून गेले आहे. अशा कठीण प्रसंगी त्यांच्या भगिनी आणि खासदार सुप्रिया सुळे या संपूर्ण कुटुंबाचा खंबीर आधार बनल्या आहेत. दिल्लीहून तातडीने बारामतीला पोहोचलेल्या सुप्रियाताईंनी स्वतःचे दुःख बाजूला सारून आपल्या वहिनी सुनेत्रा पवार, पुतणे पार्थ आणि जय यांना सावरले. अंत्यसंस्काराच्या वेळीही त्या सावलीसारख्या आपल्या कुटुंबासोबत होत्या. भावाच्या निधनाचे अतीव दुःख मनात असतानाही त्या ज्या पद्धतीने कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना धीर देत आहेत, ते पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले.

'अजित दादा अमर रहे...' घोषणांनी आसमंत दुमदुमला

गुरुवारी सकाळी अजित दादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शेवटचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. "अजित दादा परत या...", "एकच वादा, अजित दादा..." अशा घोषणांनी संपूर्ण बारामती शहर आणि परिसर दुमदुमून गेला होता. राजकीय मतभेद विसरून सर्वपक्षीय नेते आणि हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: Captain Shambhavi Pathak : 'हाय दद्दा, गुड मॉर्निंग...'; आजीला शेवटचा मेसेज अन् विमानाचा अपघात; पायलट शांभवी पाठक यांचा करुण अंत


सम्बन्धित सामग्री