मुंबई: नियतीचा खेळ कधी कधी इतका क्रूर असतो की, त्यावर विश्वास ठेवणेही कठीण होऊन बसते. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते पर्व, प्रशासकीय जरबेचा 'नारा' आणि बुलंद आवाज म्हणजेच अजितदादा पवार निघून गेल्याला आज बरोबर एक महिना पूर्ण झाला. 28 जानेवारी 2026 चा तो 'काळा बुधवार' आजही महाराष्ट्राच्या स्मरणात जिवंत आहे. याच दिवशी बारामतीच्या आकाशात झेपावलेल्या विमानाचा नियतीने घात केला आणि अवघ्या राज्याला पोरकं करून दादांनी अनंतात झेप घेतली. आज महिन्याभरानंतरही त्यांच्या आठवणींनी राजकीय वर्तुळात आणि सामान्य जनतेत एक मोठी पोकळी जाणवत आहे.
ज्या बारामतीने त्यांना शून्यातून विश्व निर्माण करताना पाहिले, त्याच मातीत त्यांच्या आयुष्याचा असा करुण अंत होईल, असे कोणालाही स्वप्नातही वाटले नव्हते. आज एक महिना उलटल्यानंतरही त्यांच्या मोबाईल नंबरवर येणारे कॉल आणि त्यावर मिळणारी शांतता ही चाहत्यांच्या काळजाला घर पाडणारी ठरत आहे.
हेही वाचा: Grampanchayat Sarpanch: राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका! मुदत संपलेल्या सरपंचांना 'प्रशासक' बनवण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला 'ब्रेक'
याच दुःखद प्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. "जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं, असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला. पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही..." या शब्दांत रोहित पवारांनी भावनांना वाट करून दिली आहे. त्यांनी दादांच्या निधनाच्या दिवशी त्यांना केलेल्या कॉलचा स्क्रीनशॉट आणि व्हॉट्सअॅप चॅट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.
मात्र, हे केवळ 'दुःख' नसून यामागे 'दडलेले सत्य' शोधण्याची गरज असल्याचे संकेतही रोहित पवारांनी दिले आहेत. 10 आणि 19 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी या अपघातावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा निव्वळ अपघात आहे की एखादा पूर्वनियोजित 'घातपात', असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) आणि ज्या कंपनीच्या (VSR) विमानातून दादा प्रवास करत होते, त्या कंपनीच्या निष्काळजीपणावर त्यांनी थेट बोट ठेवले आहे. या प्रकरणात केवळ शोक व्यक्त करून न थांबता, सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
या संघर्षात रोहित पवारांना आमदार अमोल मिटकरी यांचीही खंबीर साथ लाभली आहे. "महाराष्ट्राचा एक कार्यक्षम नेता अशा प्रकारे अपघातात जाणे, हे संशयास्पद आहे," असे म्हणत त्यांनीही उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशातील विमान सुरक्षेचा आणि व्हीआयपी प्रोटोकॉलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एखाद्या तांत्रिक त्रुटीमुळे किंवा मानवी चुकीमुळे एका जननेत्याचा बळी जात असेल, तर त्या यंत्रणांना उत्तरदायी धरलेच पाहिजे, असा सूर आता उमटू लागला आहे.
अजित पवारांचे जाणे हे केवळ एका पक्षाचे किंवा कुटुंबाचे नुकसान नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची मोठी हानी आहे. आता सर्वांच्या नजरा होणाऱ्या पुढील कायदेशीर घडामोडींकडे आणि सरकारच्या चौकशी अहवालाकडे लागल्या आहेत. 'जस्टिस फॉर अजित दादा' (#JusticeForAjitDada) ही मोहीम आता सोशल मीडियावर जोर धरत असून, जनतेला केवळ सांत्वन नको तर सत्याची प्रतीक्षा आहे.
हेही वाचा: Crime News Update: बंद खोलीत जोडप्याने 9 वर्षांच्या मुलीसह संपवलं जीवन ; तीन पानांच्या चिठ्ठीत पाळीव प्राण्याचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?