Akola hottest city India : महाराष्ट्रातील विदर्भ सध्या भीषण उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात सापडला असून, रविवारी अकोल्यात देशातील सर्वाधिक 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यापाठोपाठ अमरावतीमध्येही 46.8 अंश सेल्सिअस इतका प्रचंड पारा नोंदवला गेला. नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक बेजार झाले असून जनजीवन विसकळीत झाले आहे.
उष्णतेची लाट कायम राहणार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भातील ही उष्णतेची लाट मंगळवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील काही तासांत या भागातील कमाल तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, तर काही दुर्गम किंवा ठराविक ठिकाणी हा पारा 47 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. एप्रिल संपता संपता आणि मे महिन्याच्या आधीच तापमानाने रौद्र रूप धारण केल्याने प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांचे असह्य हाल आणि खबरदारी
विदर्भातील विविध भागात सध्या कडाक्याचे ऊन पडत असून दुपारी रस्ते ओस पडत आहेत. कडक उन्हाच्या झळा आणि कोरड्या हवेमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः अकोला, अमरावती आणि नागपूर या शहरांमधील रहिवाशांना वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत आहे. हवामान विभागाने नागरिकांना दुपारी घराबाहेर न पडण्याचा आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला असून, उष्मघातापासून वाचण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितले आहे.
हेही वाचा - Maharashtra HeatWave : राज्यात उन्हाची काहिली वाढली! या जिल्ह्यातील तापमानाचा रेकॉर्डब्रेक आकडा; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
काही दिवसांपूर्वीच जगात सर्वात उष्ण शहराचा विक्रम
याआधी काही दिवसांपूर्वी एप्रिल महिन्यातच जगातील सर्वात उष्ण शहर बनल्याचा विक्रम अकोल्याच्या नावे झाला आहे. 14 एप्रिल या दिवशी अकोला जगातील सर्वात उष्ण शहर ठरले होते. या दिवशी एल्डराडो वेदरच्या आकडेवारीनुसार, अकोल्यात तापमानाचा पारा 44 डिग्री सेल्सिअसवर पोहोचल्याने हे शहर जागतिक नकाशावर उष्णतेचा मुख्य 'हॉटस्पॉट' ठरले होते. मात्र, अकोल्यात रविवारी (26 एप्रिल 2026) तापमानाचा हाही आकडा मागे पडला आहे. आता उन्हाच्या झळांनी 47 अंशांकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, वाशिम, गडचिरोली आणि यवतमाळ यांच्यासह एकूण 9 जिल्ह्यांमधील तापमानाची जागतिक स्तरावर नोंद झाली आहे. नागरिकांसाठी चिंतेची बाब म्हणजे केवळ दिवसच नाही, तर रात्रीही तापमानात घट होत नाही. सततच्या उकाड्यामुळे जनतेमध्ये अस्वस्थता वाढली असून उष्माघाताची भीती व्यक्त होत आहे. काही ठिकाणी बळींची नोंदही झाली आहे. प्रशासनाने दुपारच्या वेळी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा - Monsoon Weather Update : 1-2 नव्हे तर तब्बल 24 वेळा मुंबईवर येणार मोठं नैसर्गिक संकट! जाहीर झालेल्या तारखा जाणून घ्या