Tuesday, November 11, 2025 10:26:38 PM

Ambadas Danve : 'कटप्रमुखां'च्या योजना 'चालू सरकार'नं केल्या बंद; शिंदे-फडणवीसांना अंबादास दानवेंचा टोला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदातील कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 8 योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं बंद केल्या.

ambadas danve  कटप्रमुखांच्या योजना चालू सरकारनं केल्या बंद शिंदे-फडणवीसांना अंबादास दानवेंचा टोला

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदातील कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 8 योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये बंद करण्यात आल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. याबाबत माहिती देणारी एक्स पोस्ट अंबादास दानवे यांनी केली आहे. या माध्यमातून महायुतीत सर्वकाही आलबेल आहे की नाही, अशी शंका उपस्थित होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. पुढील काही महिन्यांमध्ये महापालिकांसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती लोकसभा आणि विधान सभेप्रमाणेच एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाणार का, अशी चर्चा होत असतानाच अंबादास दानवेंच्या या पोस्टमुळे संभ्रम निर्माण होत आहे.

हेही वाचा : Ramdas Athawale : 'टूटे रिश्तों को जोड़ने चला...'; बाबासाहेबांचं नाव पुढे करत प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्यासाठी रामदास आठवलेंनी घातली साद

अंबादास दानवे यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. “सामान्यांना कणभर लाभ देणाऱ्या योजना बंद करून सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत,” असा आरोप दानवे यांनी केला. त्यांनी पुढे म्हटलं की, "आमच्यातून गेलेले 'कटप्रमुख' मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना दिसतात." दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये शिंदे सरकारकडून बंद करण्यात आलेल्या योजनांची यादीही दिली असून त्यात आनंदाचा शिधा, माझी सुंदर शाळा, 1 रुपयात पीकविमा, स्वच्छता मॉनिटर, 1 राज्य 1 गणवेश, लाडक्या भावाला अपरेंटीसशिप, योजनादूत योजना आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना यांचा समावेश आहे. या सर्व योजना बंद करणारे हे चालू सरकार असल्याचा आरोप करत, “निवडणुकांपुरत्या सुरू केलेल्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा आम्ही जनतेसमोर मांडू,” असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.


सम्बन्धित सामग्री