Sunday, June 15, 2025 01:00:36 PM

अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाला नवे वळणः पोलिसांच्या भूमिकेवरच संशय

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी घातलेल्या दरोड्यातील मुख्य आरोपी असलेला अमोल खोतकरचा एन्काऊंटरमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाला नवे वळणः पोलिसांच्या भूमिकेवरच संशय

विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी घातलेल्या दरोड्यातील मुख्य आरोपी असलेला अमोल खोतकरचा एन्काऊंटरमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. हा एन्काऊंटर सुपारी घेऊन करण्यात आला असल्याचा आरोप आरोपीच्या बहिणीने केला आहे. तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून पोलिसांच्या भूमिकेवर संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. 

छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरात राहणारे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा प्रकरणी मुख्य आरोपी असलेला अमोल खोतकर याचा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. वडगाव कोल्हाटी परिसरामध्ये रात्री ही चकमक झाली. यामुळे आता या प्रकरणातील सस्पेन्स आणखीनच वाढला आहे. पोलीस दरोडेखोरांच्या मागावर होते. यातील मुख्य आरोपी अमोल खोतकरला पकडण्यासाठी गेल्यावर त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पोलिसांनाच मारण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अमोलचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून देखील अधिक माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यात न्यायाधीश आहेत, न्याय आहे, सरकार आहे, सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवून आरोपीला पकडा आणि तुरुंगात टाका किंवा न्यायालयासमोर हजर करा. मात्र, मारून टाकण्याचे काम पोलिसांचे नाही. मात्र हा सुपारी देऊन केलेला खून आहे, असा आरोप आरोपी खोतकर याची बहीण रोहिणी खोतकर यांनी केला आहे. मला न्याय द्या, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा : बहिणीला प्रपोज केल्यानं तरुणाची हत्या; नाशिकमध्ये उडाली खळबळ

या प्रकरणी संशयित आरोपी अमोल खोतकर हा योगेश हसबे याच्याकडे हॉटेलवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांकडून सोमवारी रात्री सापळा रचण्यात आला. रात्री सुमारे 11 वाजता खोतकर वडगाव कोल्हाटी येथील हसबे यांच्या हॉटेलजवळ कार घेऊन आला. मात्र, पोलिसांना समोर पाहताच त्याने गोळी झाडली व कार वेगात चालवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पायावरून गाडी गेली. त्यानंतर एपीआय रवी किरण गच्चे यांनी प्रतिउत्तरादाखल गोळीबार करत खोतकरचा एन्काऊंटर केला. त्याच्यासोबत असलेल्या एका तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आम्हाला या प्रकरणी सीबीआयमध्ये केस दाखल करायची आहे. या प्रकरणात नेमके कोण होते? कोणती चोरी झाली होती? कोणी मारले? या सर्वांचा तपास सीबीआय करेल. आम्ही न्याय मागणार आहोत. बाकी आम्हाला काही नको. आम्हाला केवळ न्याय हवा आहे. आमच्या मुलाला किती गोळ्या लागल्या, हे इन कॅमेरा पोस्टमार्टम झाल्यानंतर आम्हाला माहिती होईल. इतक्या गोळ्या छातीवर कशा लागल्या? असा आरोप मृत आरोपीचे वडील बाबुराव खोतकर यांनी केला आहे.

साडेतीनशे पेक्षा जास्त सीसीटीव्ही पाहिले. 5 आरोपी पकडले होते. सहावा आरोपी अमोल खोतकर हा होता. रवी गच्चे या पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केला, कार अंगावर घातली. त्यानंतर पोलिसांनी फायर केले. त्यात अमोल खोतकर हा जखमी झाला. दवाखान्यात आणल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्यासोबत गाडीत अफिजा नावाची गर्लफ्रेंड होती. अमोल खोतकरवर 10 गुन्हे आहेत.


15 मे रोजी पहाटे 2 ते 4 यादरम्यान 6 दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाक दाखवत बंगल्यातून साडेपाच किलो सोने, 32 किलो चांदी असा सुमारे 6 कोटी रुपयांचा ऐवज लुटला होता. एवढ्या मोठ्या दरोड्याची राज्यभर चर्चा होती. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यावर तपास गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्याकडे वर्ग केला होता. 11 दिवसांपासून गुन्हे शाखेचे 7 आणि एमआयडीसी वाळूज ठाण्यातील 2 अशी 9 पथके तपास करत होती. आता याप्रकरणाची चौकशी होणारं का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री