अमरावती : अमरावती शहरातील अंसारनगर परिसरात अगरबत्ती कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. कारखान्यात अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पाहता पाहता आगीने संपूर्ण कारखान्याला वेढा दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. कारखान्यात अगरबत्ती निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ज्वलनशील साहित्यामुळे आग वेगाने पसरल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, कारखान्याला मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून याबाबत तपास केला जात आहे.
दरम्यान, या आगीच्या घटनेनंतर रहिवासी भागात ज्वलनशील साहित्याशी संबंधित कारखाना सुरू असल्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी संबंधित कारखान्याला आवश्यक परवानग्या आणि अग्निसुरक्षा मान्यता होती का, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या आरोपानुसार, कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक फायर एनओसी आणि महानगरपालिकेची परवानगी घेण्यात आली होती की नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
दाट लोकवस्तीच्या परिसरात अशा प्रकारचा कारखाना सुरू असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने मोठा अनर्थ टळल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
घटनेनंतर नागपुरी गेट पोलीस तसेच महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून घटनेची माहिती घेतली जात आहे. कारखान्याला आवश्यक परवानग्या होत्या का, अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का आणि आग लागण्यामागचे नेमके कारण काय, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जाणार आहे.
या घटनेनंतर अमरावतीतील रहिवासी भागांमध्ये सुरू असलेल्या ज्वलनशील वस्तूंशी संबंधित कारखाने आणि आस्थापनांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.