अमरावती : सततची नापिकी, दुष्काळ आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याला कंटाळून अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेतात विष प्राशन करून जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर गावात ही घटना घडली असून, 52 वर्षीय गजानन अलोने असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी संकटाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन अलोने यांच्या कुटुंबाकडे अवघी दीड एकर सामूहिक शेती होती. मात्र, सततच्या नापिकीमुळे उत्पन्न घटत गेले आणि कुटुंबावर कर्जाचा बोजा वाढत गेला. बँक ऑफ महाराष्ट्रच्या चिंचोली शाखेचे सुमारे एक लाख चाळीस हजार रुपयांचे कर्ज तसेच गृहकर्ज असल्याची माहिती समोर आली आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दिवशी गजानन अलोने हे पत्नीसोबत शेतात गेले होते. शेतातील पिकांची अवस्था पाहून ते चिंतेत होते. त्यानंतर दोघे घरी परतले. काही वेळाने गजानन पुन्हा एकटेच शेतात गेले आणि तेथे विष प्राशन केल्याचे सांगितले जात आहे.
मृत शेतकऱ्याच्या पत्नीने सांगितले की, “आम्ही दोघेही शेतात गेलो होतो. पिकांची अवस्था चांगली नव्हती आणि आमच्यावर कर्जाचाही मोठा भार होता. घरी आल्यानंतर ते पुन्हा शेतात गेले. काही वेळाने त्यांनी विष घेतल्याची माहिती मिळाली.”
घटनेनंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा: वांद्र्यात खळबळजनक घटना! चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; 40 वर्षीय आरोपी अटकेत
गजानन अलोने यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा तसेच आई-वडील असा मोठा परिवार आहे. कुटुंबाचा मुख्य आधार हरपल्याने त्यांच्या भविष्यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.
अमरावतीसह विदर्भातील अनेक भागांत दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी अडचणीत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मंगरूळ दस्तगीर येथील ही घटना पुन्हा एकदा शेती संकट आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.