मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मात्र भुजबळ यांच्या मंत्रिपदावर टीकेची झोड उठलेली पाहायला मिळत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांना मंत्रिपद दिल्याने सडकून टीका केली आहे.
विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले आहे. पक्षाने त्यांना डावलल्याने भुजबळांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. अखेर आता सहा महिन्यानंतर त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे.परंतु अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राच्या युती सरकारचे अभिनंदन, आणखी एक ईडी भूषण मंत्री राज्याला मिळाला अशी टीका दमानिया यांनी केली आहे.
हेही वाचा : Chhagan Bhujbal : राजभवनात छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
काय म्हणाल्या दमानिया?
वाह फडणवीस वाह ! म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ? असा काय नाईलाज आहे ? की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात ? असा सवाल दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. पुढे बोलताना, आणि हो, हेच भुजबळ जेव्हा जेल मध्ये होते, तेव्हा एक अगदी बिचाऱ्यासारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत ? असा सवाल दमानियांनी भुजबळांना केला. महाराष्ट्राच्या राजकारणाची किळस वाटतेय अशी टीका दमानिया यांनी केली आहे.
खालच्या घोषणा आठवतात ?
“भ्रष्टाचारीयो पर कारवाई के लिए, अब की बार 400 पार”, “भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम” या मोदी सरकारच्या घोषणा सांगून अंजली दमानिया यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. हा आहे का तो बडा कदम? ही ती कारवाई ? असा सवाल दमानियांनी मोदी सरकारला केला आहे.