Sunday, June 15, 2025 10:56:42 AM

Chhagan Bhujbal : राजभवनात छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी छगन भुजबळांना मंत्रिपदाची शपथ दिली.

chhagan bhujbal  राजभवनात छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी छगन भुजबळांना मंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. 

छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला. भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा खातं मिळणार असल्याची शक्यता आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेलं खाते भुजबळांना मिळण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा : भुजबळ मंत्रिपदाचा पदभार स्विकारतील याचा आनंद; भुजबळांच्या मंत्रिपदावर मंत्री बावनकुळेंचे भाष्य

विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही. पक्षाने त्यांना डावलल्याने भुजबळांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. अखेर आता सहा महिन्यानंतर त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. छगन भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाल्याने नाशिक जिल्ह्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 मंत्री असणार आहेत. शिवसेनेकडे देखील एक मंत्रिपद असल्याने जिल्ह्याला एकूण 4 मंत्रिपद मिळणार आहेत. छगन भुजबळ यांची एन्ट्री झाल्याने पालकमंत्री पदासाठी देखील स्पर्धा वाढणार आहे. 

भुजबळांचा राजकीय प्रवास

15 ऑक्टोबर 1947 ला छगन भुजबळांचा नाशिकमध्ये जन्म झाला. मुंबईतील व्हीजेटीआयमधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी त्यांनी घेतली. त्यांनी शाहू, फुले आंबेडकरांचे विचार मांडत 1 नोव्हेंबर 1992 साली समता परिषदेची स्थापना केली. 1973 मध्ये मुंबई महापालिकेवर निवड झाल्यानंतर राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. 1973 ते 1984 मध्ये महापालिकेत विरोधी पक्षनेता होते. त्यानंतर 1985 मध्ये मुंबईचे महापौर म्हणून काम पाहिलं आणि 1991 मध्ये  दुसऱ्यांदा महापौर झाले. 1985 ते 1990 अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवड झाली. नोव्हेंबर 1991 मध्ये महसूलमंत्री तर 1995 मध्ये गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. एप्रिल 1996 मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिलं आहे. एप्रिल 2002 ते 23 डिसेंबर 2003 या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणूनही काम केले. 2004मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड झाली. नोव्हेंबर 2004 ते 3 डिसेंबर 2008 या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री होते. 8 डिसेंबर 2008 ला उपमुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. 2009 मध्ये दुसऱ्यांदा तर 2014 मध्ये तिसऱ्यांदा आणि 2019मध्ये सलग चौथ्यांदा येवल्यातून विधानसभेवर निवड झाली.  महाविकास आघाडीच्या काळात 28 नोव्हेंबर 2019 ला अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रि‍पदी होते. महायुतीमध्ये सहभागी होऊन 2 जुलै 2023 पुन्हा अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रिपदी वर्णी लागली. तर 23 नोव्हेंबर 2024 पाचव्यांदा येवला विधानसभा मतदासंघातून आमदार म्हणून निवडून आले.   


सम्बन्धित सामग्री