Sunday, June 15, 2025 11:58:37 AM

लातुरात 20 लाखांसाठी अर्पिताचा हुंडाबळी

सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या अर्पिता शेळके या तरुणीची 20 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी हत्या करण्यात आली आहे.

लातुरात 20 लाखांसाठी अर्पिताचा हुंडाबळी

अजय घोडके, प्रतिनिधी, लातूर: राज्यात बहुचर्चित वैष्णवी हगवणे प्रकरण गाजत असतानाच, लातूरच्या चाकूर तालुक्यातील आष्टा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या अर्पिता शेळके या तरुणीची 20 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी चाकूर पोलिस ठाण्यात पती, सासरे आणि मेहुणे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: राज्य सरकारनं मागवली 'लाडकी'च्या उत्पन्नाची माहिती

नेमकं प्रकरण काय?

चाकूर तालुक्यातील हटकरवाडी येथील बीसीएची विद्यार्थिनी अर्पिता पांडे आणि नालेगाव येथे रेडीमेड कपड्यांचे दुकान चालवणारा गौरव शेळके यांची ओळख सोशल मीडियावर झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले तेव्हा सहा महिन्यांपूर्वी दोघे लातूरहून पळून गेले आणि आळंदी येथे आंतरजातीय प्रेमविवाह केला. गौरवच्या आईचे यापूर्वीच कर्करोगाने निधन झाल्यामुळे तो सहा महिन्यांपासून अर्पितासोबत पुण्यातच वास्तव्यात होता. गौरवचा ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी ते दोघे त्यांच्या मूळ गावी आष्टा येथे आले होते. 29 मे 2025 रोजी सकाळी कपडे वाळवताना तिला विजेचा शॉक लागल्याने तिला लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हेही वाचा: RCB vs PBKS IPL 2025 Final: आयपीएल 2025 अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार?

अर्पिता सहा महिन्यांपासून पुण्यात असल्यामुळे गौरवचा नालेगावमधील रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय बंद पडला होता. त्यामुळे कपड्याच्या दुकानाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पती गौरव, त्याचे वडील आणि भाऊ यांनी मिळून '20 लाख रुपये तुझ्या माहेरहून आण' अशी मागणी अर्पिताकडे केली होती. त्या संदर्भात अर्पिताने तिच्या आई-वडिलांना सांगितले होते. ही मागणी पूर्ण न केल्यानेच अर्पिताचा हुंडाबळी झाला असल्याचा दावा मयत अर्पिताचे वडील वीरेंद्र पांडे यांनी केला आहे.

हेही वाचा: हिंजवडीतल्या हुंडाबळीचा महिला आयोगावर गंभीर आरोप

याप्रकरणी मयत अर्पिताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अर्पिताचा पती गौरव शेळके, सासरा संजय शेळके, दीर कृष्णा शेळके यांच्याविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पती गौरव शेळके आणि सासरा संजय शेळके यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, दीर कृष्णा शेळके फरार असल्याचे चाकूर पोलिसांनी सांगितले आहे.


सम्बन्धित सामग्री