Friday, July 11, 2025 11:19:55 PM

कोट्यवधींचं डांबरीकरण निकृष्ट दर्जाचं; संतप्त ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा

कोट्यवधी रुपये खर्च करून दोन रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, महिनाभरातच हे रस्ते अक्षरशः हाताने उखडता येत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कोट्यवधींचं डांबरीकरण निकृष्ट दर्जाचं संतप्त ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा

विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: नुकताच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून माळीवाडगाव ते सनव आणि माळीवाडगाव ते दिनवाडा या दोन रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, महिनाभरातच हे रस्ते अक्षरशः हाताने उखडता येत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: ABU AZMI CONTROVERSY: पालखी सोहळ्याबाबत अबू आजमींनी केले वादग्रस्त वक्तव्य

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून माळीवाडगाव ते सनव तीन किलोमीटर रस्ता एक कोटी 94 लाख 48 हजार रुपये तर माळीवाडगाव ते दिनवाडा अडीच किलोमीटर रस्ता 1 कोटी 44 लाख 85 हजार रुपये खर्च करून डांबरीकरण करण्यात आले होते. ही दोन्ही कामे छत्रपती संभाजीनगर येथील साईशा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून करण्यात आली होती. मात्र, रस्त्यांची अवस्था अशी आहे की हाताने उखडता येईल आणि निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. या रस्त्यांमुळे शेतकरी आणि प्रवासी काही काळासाठी सुखावले होते. पण महिनाभरातच झालेल्या खराब स्थितीमुळे सर्वांच्या आशा मावळल्या आहेत. यावर ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेत ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. तसेच, रस्त्याचे काम नव्याने न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


सम्बन्धित सामग्री