मुंबई: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. आजपर्यंत त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. अशातच, त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे, ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तसेच, त्यांच्या या वक्तव्याने वाद पेटण्याची शक्यता आहे.
'पालख्यांमुळे रस्ता जाम होतो. हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम व्यक्ती विरोध करत नाहीत. मात्र मुस्लिमांनी रस्त्यावर नमाज पठण केल्यावर त्यांच्या विरोधात तक्रार केली जाते', असं विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी केले आहे.
काय म्हणाले अबू आजमी?
'पालख्यांमुळे रस्ता जाम होतो. रस्त्यावर हिंदूंचे अनेक सण साजरे केले जातात. हिंदू सणांविरोधात कोणतीही मुस्लिम व्यक्ती तक्रार करत नाही. मग जर मुस्लिम व्यक्तीने दहा मिनिटांसाठी रस्त्यावर नमाज पठण केलं तर त्यांच्याविरोधात तक्रार केली जाते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्यांविरोधात पासपोर्ट रद्द करण्याची धमकी दिली आहे', असं अबू आझमी म्हणाले.
अबू आजमींनी साधला नितेश राणेंवर निशाणा:
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी नितेश राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 'महाराष्ट्र राज्यात दोनदा शपथ घ्यावी लागते. आमदार झाल्यानंतर आणि मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतरही महाराष्ट्र राज्यातील मंत्री अजूनही जातीवाद करत आहेत', हिंदी सक्ती बाबत बोलताना आमदार अबू आजमी म्हणाले.
मराठीचा सन्मान झाला पाहिजे - आझमी:
'महाराष्ट्र राज्यात मराठीचा सन्मान झाला पाहिजे. मात्र, काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत हिंदी भाषा असणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात मराठी, हिंदी आणि नंतर इंग्रजी अशी भाषिक सूत्र असायला हवे,' अशी माहिती अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'राज्यातील मराठी प्रश्नांवर प्रकाश टाकून राजकीय नेते जनतेची दिशाभूल करत आहेत', असं देखील अबू आझमी म्हणाले.
रविवारी सकाळी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सोलापूर येथील सरकारी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. अमेरिकेने इस्रायल-इराण युद्धात हल्ला केल्यानंतर आमदार अबू आझमी यांनी इराणच्या समर्थनार्थ विधान केले. 'इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी भारतात अनेक पॅलेस्टिनी नागरिकांना आश्रय दिला. त्यामुळे विद्यमान भारतीय पंतप्रधानांनी देखील इराणला पाठिंबा द्यावा,' अशी प्रतिक्रिया अबू आझमींनी दिली. अबू आझमींनी सवाल उपस्थित केला की, 'जेव्हा इस्रायलने गाजा पट्टीत हल्ला करून अनेक निष्पाप लहान मुलांचे जीव घेतले, तेव्हा अमेरिकेने हे युद्ध का थांबवले नाही? तेव्हा अमेरिका का गप्प राहिला?'.