Thursday, March 12, 2026 10:38:50 PM

Children Aadhar Card: तुमच्या बाळाचे 'बाल आधार' बनवा फिंगरप्रिंटशिवाय तेही खर्च न करता, जाणून घ्या सोप्या स्टेप्स

या प्रक्रियेसाठी तुम्हाला केवळ दोन मुख्य कागदपत्रांची आवश्यकता आहे.

children aadhar card तुमच्या बाळाचे बाल आधार बनवा फिंगरप्रिंटशिवाय तेही खर्च न करता जाणून घ्या सोप्या स्टेप्स

मुंबई: पालकांनो, पाल्याचे आधार कार्ड काढायचे म्हटले की, डोळ्यांसमोर उभे राहतात ते आधार केंद्रांवरील लांबच लांब रांगा आणि बायोमेट्रिक्ससाठी चाललेली कसरत. पण आता ही चिंता सोडा! पाच वर्षांखालील मुलांसाठी केंद्र सरकारने आधार कार्डची प्रक्रिया 'सुलभ' केली आहे. विशेष म्हणजे, या वयोगटातील मुलांच्या हातांचे ठसे किंवा डोळ्यांचे स्कॅनिंग (Biometrics) करण्याची कोणतीही गरज नसते. केवळ पालकांच्या कागदपत्रांच्या आधारे तुमच्या घरच्या 'बाळराजाचे' आधार कार्ड अगदी सहज बनवता येते.

पाच वर्षांखालील मुलांसाठी असलेल्या या निळ्या रंगाच्या कार्डला 'बाल आधार' असे संबोधले जाते. हे कार्ड पालकांच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असते.तुमच्या सोयीसाठी सरकारने ही प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस आणि सोपी करण्यावर भर दिला आहे. यामध्ये मुलाचा केवळ एक फोटो घेतला जातो आणि पालकांच्या ओळखीच्या पुराव्यावरून नोंदणी पूर्ण केली जाते.

आवश्यक कागदपत्रे 

या प्रक्रियेसाठी तुम्हाला केवळ दोन मुख्य कागदपत्रांची आवश्यकता आहे. पहिले म्हणजे आई किंवा वडील यांपैकी एकाचे आधार कार्ड आणि दुसरे म्हणजे मुलाचा जन्माचा दाखला (Birth Certificate). विशेषतः 1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्मलेल्या बालकांसाठी जन्माचा दाखला हा एकमेव आणि अनिवार्य ओळख पुरावा मानला जातो. या दोन गोष्टी सोबत असल्यास तुमचे काम 'फत्ते' झालेच म्हणून समजा.

हेही वाचा: Palghar Highway Accident : थोडक्यात बचावलं नाही तर..., भरधाव ॲसिडचा टँकर थेट हॉटेलमध्ये शिरला; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात

मोफत सेवा आणि सुलभ प्रक्रिया

जवळच्या 'आधार सेवा केंद्रात' गेल्यावर ऑपरेटर मुलाची माहिती प्रणालीमध्ये भरतो. तिथेच मुलाचा फोटो काढला जातो आणि पालकांच्या आधारशी त्याचे लिंकिंग केले जाते. सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही संपूर्ण प्रक्रिया बिल्कुल मोफत (Free) आहे. यासाठी तुम्हाला एक रुपयाही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे कोणी पैशांची मागणी केल्यास सावध राहा!

'अपडेट' प्रक्रिया महत्त्वाची 

मुलांचे वयाचे पाच वर्षे पूर्ण झाल्यावर बायोमेट्रिक्स (बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅनिंग) अपडेट करणे अनिवार्य आहे. आधार क्रमांक तोच राहतो, फक्त माहिती अद्ययावत केली जाते. हे पहिले अपडेट देखील विनामूल्य असते. त्यानंतर वयाच्या 15 व्या वर्षी पुन्हा एकदा अंतिम बायोमेट्रिक अपडेट करावे लागते, जेणेकरून हे आधार कार्ड आयुष्यभरासाठी वैध ठरते.

उशीर कशाला? आजच नोंदणी करा!

सरकारी योजनांचा लाभ असो वा शाळेतील प्रवेश, आधार कार्ड ही आजच्या काळाची गरज बनली आहे. त्यामुळे जर तुमच्या चिमुकल्याचे आधार कार्ड अद्याप काढले नसेल, तर आजच जवळच्या केंद्राला भेट द्या. ही प्रक्रिया जितकी सोपी आहे, तितकीच ती तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी महत्वाची आहे.

हेही वाचा: Devendra Fadnavis: विजयाचा गुलाल उधळताच फडणवीस तडकाफडकी दिल्लीला रवाना; अमित शाह यांच्या भेटीत 'या' मोठ्या निर्णयावर शिक्कामोर्तब?


सम्बन्धित सामग्री