बारामती: नियतीचा खेळ किती अजब आणि क्रूर असतो, याचा प्रत्यय बुधवारी संपूर्ण महाराष्ट्राने घेतला. बारामती येथील विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, या दुर्घटनेत एका अशा स्वप्नाचाही अंत झाला, जे एका पित्याच्या अपमानाचे शल्य पुसण्यासाठी उभे राहिले होते. जौनपूरच्या मातीतून आलेली आणि वरळीत स्थायिक झालेली 29 वर्षीय फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी आज तिच्या वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करण्याच्या जिद्दीने आकाशात झेपावली होती, पण दुर्दैवाने ते तिचं अखेरचं उड्डाण ठरलं.
पिंकीचे वडील शिवकुमार माळी यांचे विमान क्षेत्राशी असलेले नाते अत्यंत क्लेशदायक होते. 1989 मध्ये दिल्ली विमानतळावर ड्रायक्लीनर म्हणून काम करत असताना, तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या विमानाची स्वच्छता करताना त्यांच्याकडून एक छोटी चूक झाली आणि त्यांना नोकरी गमवावी लागली. तो अपमान पचवून त्यांनी टॅक्सी चालवून संसाराचा गाडा ओढला. वडिलांच्या डोळ्यातील ते दुःख पाहून पिंकीने आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न पाहिलं होतं. "मी तुमचं स्वप्न पूर्ण करेन आणि ज्या विमानाने तुमची नोकरी हिरावली, त्याच क्षेत्रात नाव कमवून दाखवेन," हे तिचं आश्वासन तिने एअर होस्टेस होऊन पूर्णही केलं होतं. पण नियतीने बुधवारी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास घात केला.
मुंबईच्या धावपळीतून सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी अजित पवारांचे चार्टर्ड विमान (Learjet 45) बारामतीकडे झेपावले होते. निवडणुकांच्या प्रचाराचा धडाका लावण्यासाठी निघालेले हे विमान धावपट्टीच्या अगदी जवळ आले असतानाच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या भीषण आगीत अजित पवार, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, सुरक्षा रक्षक विदीप जाधव आणि पिंकी माळी यांचा जागीच मृत्यू झाला. "बाबा, मी दादांसोबत बारामतीला जातेय, तिथून नांदेडला जाऊन तुम्हाला फोन करते," हे तिचे मंगळवारच्या संध्याकाळचे शब्द आता तिच्या वडिलांच्या कानात साद घालत आहेत.
हेही वाचा: Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे बारामतीत; पवार कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट
पिंकी विवाहित होत्या आणि त्यांचा पुण्यात पतीसोबत सुखी संसार सुरू होता. त्यांची जिद्द आणि कामाप्रती असलेली निष्ठा इतकी दांडगी होती की, ती अनेकदा मोठ्या नेत्यांच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या विमानांवर कर्तव्यावर असायच्या. पण बुधवारी सकाळी जेव्हा टीव्हीवर 'ब्रेकिंग न्यूज'मध्ये पिंकीचे नाव झळकले, तेव्हा वरळीतील त्यांच्या घराबाहेर नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. ज्या मुलीने वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी विमान क्षेत्र निवडले, तिनेच त्याच क्षेत्रात आपला जीव गमावल्याचे ऐकून परिसरात शोककळा पसरली आहे.
उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील भैंसा या त्यांच्या मूळ गावीही आज प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत. शिवकुमार माली यांनी मुलीला एका स्वाभिमानी करिअरसाठी प्रोत्साहन दिले होते, पण काळ इतका निर्दयी असेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. "तिने माझं स्वप्न पूर्ण केलं होतं, पण मला सोडून जाईल असं कधीच वाटलं नव्हतं," अशा शब्दांत तिच्या वडिलांनी आपला हुंदका आवरला.
एका बाजूला राज्याने एक धडाडीचा नेता गमावला असताना, दुसऱ्या बाजूला एका मध्यमवर्गीय कुटुंबाने आपली हिंमत आणि स्वप्न गमावले आहे. बारामतीची ती धावपट्टी केवळ विमानाचा अपघात नव्हता, तर अनेक कुटुंबांच्या सुखी भविष्याचा झालेला कोळसा होता. पिंकीच्या जाण्याने पुन्हा एकदा सिद्ध झाले की, मृत्यू कधी आणि कोणत्या रूपात घाला घालेल, हे सांगणे अशक्य आहे.
हेही वाचा: Ajit Pawar Memories: गुलाबी जॅकेट, नवी स्टाईल; अजितदादांच्या 'या' लुकने सगळ्यांनाच भुरळ घातली