बारामती: बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, यंदाची निवडणूक अधिकच चुरशीची ठरणार आहे. कारण, या निवडणुकीत एकाच घरातील दोन मोठ्या नेत्यांमध्ये थेट सामना रंगणार आहे. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वतंत्र पॅनल मैदानात उतरणार असून, त्यांच्याविरोधात तावरे गुरु-शिष्य जोडीही सज्ज झाली आहे.
मागील काही दिवसांपासून पवार गट एकत्र येऊन ही निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्या फोल ठरवत, शरद पवार यांचे बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि अजित पवार यांचे श्री निळकंठेश्वर पॅनल अशी दोन स्वतंत्र यंत्रणा उभी राहिली आहे. या दोन पॅनलमधील लढतीत आता तिसरे पॅनल म्हणजेच चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलची भर पडली असून, या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा: सुधाकर बडगुजर यांना भाजपाकडून ग्रीन सिग्नल?
उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः ब वर्गातून उमेदवार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली श्री निळकंठेश्वर पॅनलच्या 21 उमेदवारांची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या गटाचे उमेदवारांची यादी देखील लवकरच जाहीर होणार आहे. दुसरीकडे, सहकार बचाव शेतकरी पॅनलमधून चंद्रराव आणि रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील उमेदवारांची यादी देखील अंतिम टप्प्यात आहे.
1995 आणि 2015 मध्ये या तावरे जोडगोळीने पवार गटाच्या एकत्रित ताकदीलाही धूळ चारत कारखान्याचा ताबा मिळवला होता. त्यामुळे यंदाही त्यांच्या बाजूकडेही लक्ष लागून आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ हा सामना घडणार असल्याने ही निवडणूक केवळ तालुका पातळीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर संपूर्ण राज्याचे लक्ष या माळेगाव साखर कारखान्याकडे लागले आहे.
हेही वाचा: मांजरांचा वाद पोहचला थेट पोलीस स्टेशनपर्यंत; कोल्हापुरात बेकायदेशीर प्राणीपालनावर कारवाई
प्रचाराला उद्यापासून सुरुवात होणार असून, राजकीय तोफा आता एकमेकांवर धडाडणार आहेत. त्यामुळे माळेगावातील ही निवडणूक म्हणजे फक्त सहकाराची निवडणूक नसून, ती प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. सहकार क्षेत्रातील या तिरंगी लढतीकडे राज्यभरातील राजकीय आणि सहकारी वर्तुळाचे लक्ष लागले असून, निकाल काय लागतो याची उत्सुकता सर्वत्र आहे.