कोल्हापूर: शहरातील रंकाळा स्टॅण्ड परिसरातील आयरेकर गल्लीमध्ये एका दाम्पत्याने आपल्या घरात बेकायदेशीररित्या 35 पेक्षा अधिक मांजऱ्या पाळल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी आणि घाण पसरण्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोठी कारवाई करत हे सर्व प्रकार उघडकीस आणले.
प्रदीप बुलबुले व त्यांच्या पत्नी माधुरी बुलबुले यांनी त्यांच्या राहत्या घरात मोठ्या प्रमाणात मांजऱ्या पाळल्या होत्या. मात्र या मांजऱ्यांची योग्य ती स्वच्छता, देखभाल न झाल्यामुळे त्यांच्या घरात व परिसरात दुर्गंधीयुक्त कचरा आणि आडगळ साचली होती. या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले होते.
हेही वाचा: शेअर मार्केटमध्ये भरघोस नफ्याचे आमिष; वाशीतील जेष्ठ नागरिकाची 4.76 कोटींची सायबर फसवणूक
या बाबत स्थानिक रहिवाशांनी कोल्हापूर महापालिकेकडे तसेच संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुलबुले दाम्पत्याच्या घरात धाड टाकून सर्व मांजऱ्या पकडण्याची मोहीम राबवली. काही मांजऱ्या यावेळी पळून गेल्या, तर काहींना यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले. विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान एका मांजरीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करत त्याला चावल्याची नोंद आहे.
कारवाई दरम्यान बुलबुले यांच्या घरातून तब्बल 2 ट्रॅक्टर इतका कचरा आणि आडगळ बाहेर काढण्यात आला. संपूर्ण घरामध्ये साचलेली घाण, मांजऱ्यांचे विष्ठा, खाद्यपदार्थांचे अवशेष आणि इतर दुर्गंधीयुक्त वस्तूंमुळे परिसरात रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिकेच्या या कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे.
हेही वाचा:सुधाकर बडगुजर यांना भाजपाकडून ग्रीन सिग्नल?
ही महत्त्वपूर्ण कारवाई अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, सहायक आयुक्त कृष्णा पाटील आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये आरोग्य निरीक्षक स्वप्नील उलपे, नंदकुमार पाटील, सहाय्यक आरोग्य निरीक्षक दिलीप पाटणकर, सुरज घुणकीकर, मुकादम आणि महापालिकेचे कामगार सहभागी झाले होते.
बुलबुले दाम्पत्याने मांजऱ्यांसाठी कुठलाही परवानाही घेतला नव्हता, तसेच त्यांच्या पाळीव प्राण्यांची काळजी न घेतल्याने परिसरातील नागरिकांना आरोग्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून महापालिकेने पुढील काळात अशा बेकायदेशीर प्राणीपालनावर अधिक कडक पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.