नवी मुंबई: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्हेगारीने वेग घेतलेला असताना, नवी मुंबईतील वाशी परिसरात एका जेष्ठ नागरिकाची तब्बल 4 कोटी 76 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली विश्वास संपादन करून ही फसवणूक केली. सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करत दोन आरोपींना अटक केली आहे.
जेष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅपवरून अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला होता. या मेसेजमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगण्यात आले. सुरूवातीला थोडीशी रक्कम गुंतवण्यासाठी सांगण्यात आली. त्यानंतर एक बनावट अॅप डाउनलोड करण्यास सांगितले गेले. या अॅपमध्ये त्यांनी गुंतवलेली रक्कम आणि त्यावर मिळालेला नफा दाखवण्यात आला.
हेही वाचा: सुधाकर बडगुजर यांना भाजपाकडून ग्रीन सिग्नल?
विशेष म्हणजे, सुरुवातीला या जेष्ठ नागरिकाने गुंतवलेल्या रकमेवर नफा मिळवून तो आपल्या बँक खात्यातून काढू शकले, यामुळे त्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला. हा विश्वास मिळवत गुन्हेगारांनी हळूहळू अधिक रक्कम गुंतवण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं. अखेर त्यांनी तब्बल 4 कोटी 76 लाख रुपये गुंतवले. अॅपमध्ये त्यांना 8 ते 9 कोटी रुपयांचा बनावट नफा दाखवण्यात आला होता.
मात्र, जेव्हा त्यांनी या नफ्याची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना पैसे निघत नसल्याचे लक्षात आले. काही वेळा तांत्रिक अडचणीचं कारण सांगण्यात आलं. अखेर सतत टाळाटाळ आणि गैरसोयींचा अनुभव आल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली.
हेही वाचा:'आम्ही मराठी माणसासाठी काम ... ; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर भरत गोगावले यांची जोरदार टीका
त्यानंतर त्यांनी तात्काळ नवी मुंबई सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करत कसून तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन, व्यवहारांचे रेकॉर्ड, बनावट अॅपचा डेटाबेस यावरून पोलिसांनी दोन आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली.
या प्रकरणाबाबत सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी सांगितले की, 'सायबर गुन्हेगार नवीन पद्धतीने नागरिकांना गंडवत आहेत. विशेषतः जेष्ठ नागरिक हे अशा गुन्ह्यांचे सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंक, अॅप किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नये. सतर्कता हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे.'