गोंदिया जिल्ह्याातून एक अतिशय धक्कादायक आणि थरारक घटना समोर आलेली आहे. अस्थी विसर्जनासारख्या शांत धार्मिक विधीदरम्यान अचानकच मधमाशांनी हल्ला केलाय. या घडलेल्या प्रकारामुळे अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमात मोठा हाहाकार उडाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियातील जब्बार टोला येथे काही कुटुंबीय अस्थी विसर्जनासाठी आले होते. विधी सुरु असतानाच झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्याला धक्का लागला आणि असंख्य मधमाशांनी शेट लोकांवर हल्ला केला, अशी माहिती सध्या समोर येत आहे.
याच भयानक हल्ल्यात तब्बल 30 ते 35 जणांना मधमाशांनी दंश केला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घटनास्थळी पळापळ सुरु झाली. लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. या घटनेत एका व्यक्तीला सर्वाधिक दंश झाल्याने त्याची प्रकृती सध्या अत्यंच चिंताजनक झाली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.