Wednesday, February 18, 2026 05:12:45 PM

Mumbai Belasis Flyover: विक्रमी वेळेत काम पूर्ण करूनही मुंबई सेंट्रलचा बेलासिस पूल का आहे बंद? धक्कादायक कारण समोर

बेलासिस उड्डाणपूल विक्रमी वेळेत पूर्ण होऊनही केवळ व्हीआयपी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत बंद ठेवण्यात आला आहे.

mumbai belasis flyover विक्रमी वेळेत काम पूर्ण करूनही मुंबई सेंट्रलचा बेलासिस पूल का आहे बंद धक्कादायक कारण समोर

मुंबई: मुंबईच्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांसाठी एकीकडे आनंदाची बातमी आहे, तर दुसरीकडे राजकीय दिरंगाईचा कडवट अनुभवही पदरी पडत आहे. मुंबई सेंट्रल परिसरातील महत्त्वाचा दुवा असलेला 'बेलासिस उड्डाणपूल' विक्रमी वेळेत पूर्ण होऊनही केवळ 'व्हीआयपी' उद्घाटनाच्या प्रतीक्षेत बंद ठेवण्यात आला आहे. मुंबईला नवे महापौर आणि उपमहापौर मिळेपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याने संतापाची लाट उसळली आहे.

विक्रमी वेळेत काम, पण नियोजनाचा 'खो'

'वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही' असे म्हटले जाते, मात्र मुंबईतील विकासकामांच्या बाबतीत राजकारण वेळेलाही रोखून धरताना दिसत आहे. सप्टेंबर 2024 मध्ये या पुलाच्या पुनर्बांधणीचा कार्यादेश निघाला आणि 1 ऑक्टोबरपासून कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. विशेष म्हणजे, निविदेनुसार हे काम पूर्ण करण्यासाठी एप्रिल 2026 ची मुदत होती. मात्र, पालिका आणि रेल्वे विभागाच्या अभियंत्यांनी अहोरात्र मेहनत घेत अवघ्या 15 महिने 6 दिवसांत, म्हणजेच 20 जानेवारी 2026 रोजी पुलाचे काम फत्ते केले. मुदतीपूर्वी काम पूर्ण करून अभियंत्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले, पण आता चेंडू राजकारण्यांच्या दरबारात आहे.

महापौरांच्या प्रतीक्षेत 'कुलूप' बंद रस्ता

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारीला हा पूल जनतेसाठी खुला होणे अपेक्षित होते. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या आगामी महापौर आणि उपमहापौरांच्या हस्तेच याचे श्रीगणेशा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 11 किंवा 12 फेब्रुवारीला महापौर निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचाच अर्थ, पूर्ण झालेला पूल केवळ एका रिबीन कापण्याच्या सोहळ्यासाठी किमान दोन आठवडे धूळ खात पडून राहणार आहे. 'दुभत्या गाईच्या लाथा गोड' असं मानून मुंबईकर आजवर सोसत आले आहेत, पण हक्काचा रस्ता तयार असूनही वळसा घालून जावे लागणे ही क्रूर थट्टाच म्हणावी लागेल.

हेही वाचा: Ajit Pawar Last Call: पुतण्याला अजित पवारांचा शेवटचा फोन; ‘सगळ्यांना सोबत घेऊन …’ अपघाताआधीचा शेवटचा संवाद समोर

वाहतूक कोंडीचा विळखा कायम

ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल या भागांना जोडणारा हा पूर्व-पश्चिम दुवा गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने स्थानिक वाहतुकीचे अक्षरश: तीनतेरा वाजले आहेत. सध्या या पुलाअभावी जहांगीर बोमन बेहराम मार्ग, ग्रॅण्ट रोडचा दादासाहेब भडकमकर मार्ग आणि महालक्ष्मी स्थानक पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. बेलासिस पूल सुरू झाल्यास पठे बापूराव मार्गावरील ताण हलका होऊन दक्षिण मुंबईतील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, प्रशासकीय हट्टापायी हा दिलासा सध्या तरी 'तारीख पे तारीख' मध्ये अडकला आहे.

लोकाभिमुख निर्णयाची गरज

एकीकडे मुंबईच्या विकासाचा वेग वाढवण्याच्या गप्पा मारल्या जातात, तर दुसरीकडे जनहितापेक्षा राजकीय प्रतिष्ठा मोठी ठरत आहे. रेल्वे आणि पालिकेच्या अभियंत्यांनी ज्या जिद्दीने हे काम मुदतीआधी पूर्ण केले, त्याच तत्परतेने प्रशासनाने हा पूल तातडीने खुला करणे अपेक्षित होते. आता महापौर निवडीपर्यंत मुंबईकरांना हा वाहतूक कोंडीचा वनवास आणखी किती दिवस सोसावा लागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा: India US Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब; 10 अब्ज डॉलर्सच्या भारतीय मालाला अमेरिकेत मिळणार 'मोफत' एन्ट्री


सम्बन्धित सामग्री