रायगड: राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते भरत गोगावले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या घरामध्ये कथित अघोरी पूजा केल्याचा नवा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत थेट आरोप केले आहेत.
या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचे कपडे घातलेला एक व्यक्ती काही धार्मिक विधी करताना दिसतोय आणि गोगावले त्याच ठिकाणी खुर्चीवर बसलेले आहेत. यासोबतच भगव्या वस्त्रधारी काही व्यक्तीही उपस्थित असल्याचे दिसते. सूरज चव्हाण यांनी ट्विटमध्ये 'बाबा भरतशेठ + अघोरी विद्या = पालकमंत्री?' असा टोला लगावला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी गोगावले यांनी ही पूजा केल्याचा संशय आहे.
हेही वाचा: राणे बंधूंमध्ये नव्या वादाची ठिणगी; सोशल मीडियावर 'तो' स्क्रीनशॉट शेअर करत म्हणाले...
याआधीही शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी असाच एक व्हिडिओ शेअर करत गोगावले यांच्यावर अघोरी पूजा केल्याचा दावा केला होता. त्यामुळे आता दुसऱ्या व्हिडिओमुळे या वादाला नव्याने उधाण आले आहे. विशेष म्हणजे रायगडच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिंदे गटामध्ये सध्या तणाव आहे. अदिती तटकरे यांच्या नावाला गोगावले यांनी विरोध दर्शवला असून, त्यावरूनही राजकीय तणाव वाढला आहे.
हेही वाचा: Ashadhi Wari 2025: पंढरपूर वारीचं गुपित काय? शेकडो मैल चालणाऱ्या लाखोंच्या श्रद्धेमागचा इतिहास जाणून घ्या
गोगावले यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. 'अघोरी पूजा करायचीच असती, तर पालकमंत्रिपदासाठीच केली नसती का?' असा प्रतिप्रश्न करत त्यांनी स्पष्ट केलं की, ते नियमितपणे पंढरपूर, सिद्धिविनायक आणि स्वामी समर्थ मंदिरांना भेट देतात. त्यामुळे अघोरी पूजा केल्याचा आरोप निराधार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.