Wednesday, May 14, 2025 10:59:45 PM

भिडे पूल वाहतुकीसाठी पुढील दीड महिना बंद, नागरिकांची मोठी गैरसोय

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला बाबा भिडे पूल पुढील दीड महिना वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे हा पूल बंद करण्यात आल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

भिडे पूल वाहतुकीसाठी पुढील दीड महिना बंद नागरिकांची मोठी गैरसोय

पुणे: पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला बाबा भिडे पूल पुढील दीड महिना वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाच्या बाजूला असलेल्या पादचारी पुलाचे काम सुरू असल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे हा पूल बंद करण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने वाहनधारक नारायण पेठ, सदाशिव पेठ, डेक्कन आणि उपनगरांमधून या पुलावरून ये-जा करतात. त्यामुळे या निर्णयाचा थेट परिणाम शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे.

वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भिडे पूल बंद झाल्यामुळे पर्यायी मार्गांची गरज निर्माण झाली असून, सध्या पर्याय सुचवण्याचे काम सुरू आहे. मात्र, काम पूर्ण होईपर्यंत या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी, जेव्हा ऑफिसला जाण्याची आणि परत येण्याची वेळ असते, तेव्हा या पुलाच्या बंदीचा परिणाम अधिक तीव्र जाणवतो आहे.

नाशिकमध्ये सीएनजीचा तुटवडा; २६ एप्रिलपासून पंप बंद करण्याचा इशारा
 

बाबा भिडे पूल हा मुठा नदीवर वसलेला असून, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील अत्यंत महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. या पुलाचा वापर करून नागरिक जे एम रोड, एफसी रोड, गरवारे कॉलेज परिसर आणि डेक्कन भागात सहज प्रवेश करतात. उपनगरांमधून येणाऱ्या वाहनधारकांसाठी देखील हा पूल महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे पूल बंद झाल्याने नदीपात्रातील वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.

मेट्रो प्रशासनाने पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि कामाच्या अचूकतेसाठी वाहतूक बंद करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी कोणतीही पूर्वकल्पना न देता हे काम सुरू करण्यात आले. पुलाजवळ फक्त काम सुरू आहे, क्षमस्व अशी पाटी लावण्यात आली असून, त्याव्यतिरिक्त मार्गदर्शन करणारी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक वाहनचालक गोंधळात सापडले आहेत.

दरम्यान, नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत असून, प्रशासनाने लवकरात लवकर पर्यायी मार्गांची माहिती जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. वाहतूक पोलिसांसमोर देखील आता नव्या मार्गांची आखणी आणि वाहतूक नियंत्रणाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

शहरातील महत्त्वाचा पूल बंद झाल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा थेट परिणाम जाणवतो आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने यासंबंधी अधिक पारदर्शकता दाखवून नागरिकांच्या सहकार्याने काम पूर्ण करणे गरजेचे आहे. पुणेकरांच्या अपेक्षा एकच काम वेळेत पूर्ण व्हावं आणि भिडे पूल लवकरात लवकर पुन्हा सुरु व्हावा.


सम्बन्धित सामग्री