Monday, March 09, 2026 08:30:12 AM

Bhiwandi Mayor Election: भिवंडीत 'काट्याने काढला काटा'; भाजप बंडखोराचा करेक्ट कार्यक्रम, नारायण चौधरींच्या गळ्यात महापौरपदाची माळ

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या रणनीतीमुळे भाजपला अनपेक्षित धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

bhiwandi mayor election भिवंडीत काट्याने काढला काटा भाजप बंडखोराचा करेक्ट कार्यक्रम नारायण चौधरींच्या गळ्यात महापौरपदाची माळ

भिवंडी: राजकारणात कुणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला आला आहे. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत अशी काही नाट्यमय घडामोड घडली की, संपूर्ण राज्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले आहेत. 'काट्याने काटा काढणे' या म्हणीला साजेसा डाव टाकत, काँग्रेसने चंद्रपूर महापालिकेतील पराभवाचा वचपा भिवंडीत अचूक काढला आहे. भाजपचेच प्रबळ नेते आणि बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांना 'भिवंडी सेक्युलर फ्रंट'च्या तंबूत खेचून काँग्रेसने थेट सत्ताधाऱ्यांवर राजकीय सर्जिकल स्ट्राईक केला आहे.

शुक्रवारी पार पडलेल्या या अत्यंत चुरशीच्या आणि बहुचर्चित निवडणुकीत अखेर भिवंडी सेक्युलर फ्रंटचे उमेदवार नारायण चौधरी यांनी शानदार बाजी मारली. हात वर करून घेण्यात आलेल्या या खुल्या मतदान प्रक्रियेत चौधरी यांनी तब्बल 48 मते खिशात घालत महापौरपदाच्या खुर्चीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांच्या विरोधात रिंगणात असलेल्या कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना 25 मतांवर, तर अधिकृत भाजपच्या उमेदवार स्नेहा पाटील यांना अवघ्या 15 मतांवर समाधान मानावे लागले. या आकडेवारीने भिवंडीत भाजपला आत्मपरीक्षणाचा मोठा धडा दिला आहे.

हेही वाचा: Sanjay Shirsat on Ganesh Naik: 'गणेश नाईक भाजप सरकारलाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत'; संजय शिरसाटांनी नाईकांना सुनावले खडेबोल

या संपूर्ण राजकीय भूकंपाची बीजे तिकीट वाटपातच रोवली गेली होती. भिवंडी महापालिकेत महायुतीमध्ये आधीच ठिणगी पडली होती. महापौरपदासाठी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे शड्डू ठोकले होते. त्यातच भाजपचे निष्ठावान आणि महापौरपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे नारायण चौधरी यांना पक्षाने तिकीट नाकारले. हा अपमान जिव्हारी लागल्याने चौधरी यांनी थेट बंडाचे निशाण फडकवले आणि आपल्या समर्थक असलेल्या सहा नगरसेवकांना सोबत घेऊन ते भिवंडी सेक्युलर फ्रंटच्या गळाला लागले. याच एका निर्णयाने भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडवून दिली होती.

नारायण चौधरी यांच्या विजयाचे गणित हे राजकीय मुत्सद्देगिरीचा उत्तम नमुना ठरले आहे. चौधरी यांना मिळालेल्या 48 मतांमध्ये काँग्रेसच्या 30, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 आणि स्वतःच्या गोटातील भाजपच्या सहा बंडखोर नगरसेवकांच्या मतांचा भक्कम पाया होता. सुरुवातीला काँग्रेसकडून मोमीन तारिक अब्दुल बारी यांनीही दोन्ही पदांसाठी उमेदवारी दाखल केली होती; मात्र ऐनवेळी राजकीय शहाणपण दाखवत आघाडीने नारायण चौधरी यांच्या पारड्यात त्यांचे संपूर्ण वजन टाकले आणि विजयाची 'मॅजिक फिगर' लीलया गाठली.

दुसरीकडे, या निवडणुकीत शिवसेनेची भूमिकाही तितकीच लक्षवेधी ठरली. विशेष सभेच्या सुरुवातीलाच शिवसेनेचे बाळाराम चौधरी आणि सुचिता म्हात्रे यांच्यासह तब्बल सहा उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज अचानक मागे घेतले. त्यानंतर शिवसेनेने आपली 12 मते आणि समाजवादी पक्षाच्या (सप) सहा नगरसेवकांची मते अशी एकूण मिळून कोणार्क विकास आघाडीचे उमेदवार विलास पाटील यांच्या पारड्यात टाकली. शिवसेनेच्या या अनपेक्षित खेळीमुळे भाजपच्या उमेदवार स्नेहा पाटील पूर्णपणे एकाकी पडल्या आणि त्यांना केवळ 15 मतांवर रोखण्यात विरोधकांना यश आले.

भिवंडीतील हा निकाल केवळ एका महापालिकेपुरता मर्यादित नाही, तर तो राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी मानला जात आहे. मित्रपक्षांना सोबत ठेवण्यात आलेले अपयश आणि स्वकीयांच्या नाराजीकडे केलेले दुर्लक्ष भाजपला किती महागात पडू शकते, हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. तर दुसरीकडे, योग्य वेळी अचूक राजकीय खेळी करत काँग्रेसने भिवंडीत मिळवलेला हा विजय त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य देणारा ठरला आहे.

हेही वाचा: Devendra Fadnavis On AI: 'जग भारताची प्रशंसा करतंय, पण विरोधक मात्र...'; देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका


सम्बन्धित सामग्री