मुंबई : बोरिवलीतील एका हॉटेलमध्ये म्हैसूर मसाला डोशामध्ये उंदीर आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत हॉटेल चालकाकडे मोठ्या रकमेची मागणी केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणात बोरिवली पोलिसांनी एका 36 वर्षीय महिलेला खंडणीची रक्कम स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले आहे.
मानसी अमित आचार्य (36), रा. गोराई-बोरिवली, असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 24 सप्टेंबर रोजी मानसी आचार्य दोन पुरुष आणि एका मुलासोबत संबंधित हॉटेलमध्ये आली होती. त्यावेळी म्हैसूर मसाला डोशामध्ये उंदीर आढळल्याचा दावा करत हॉटेलमध्ये गोंधळ झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. यानंतर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले होते.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला. त्यामुळे हॉटेल काही काळ बंद ठेवण्याची वेळ आल्याचा दावा हॉटेल चालकाने केला आहे.
यानंतर संबंधित व्यक्तींनी व्हिडिओ सोशल मीडियावर आणखी व्हायरल करण्याची धमकी देत हॉटेल चालकाला फोन केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला हॉटेल चालकाकडे तब्बल 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. वारंवार फोन करून पैशांसाठी दबाव आणला जात असल्याने अखेर 6 लाख रुपयांवर तडजोड झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. यातील 1 लाख रुपये आधीच रोख स्वरूपात घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे.
29 सप्टेंबर रोजी हॉटेल चालकाने बोरिवली पोलिसांकडे अर्ज दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पकडण्याची तयारी केली. बोरिवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय पाटील आणि त्यांच्या पथकाने 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.45 वाजता कारवाई केली.
पंचांसमक्ष 6 लाख रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना मानसी आचार्य हिला पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणात मानसीची बहीण किनजल सुभाष भाटीया हिच्यासह इतर नातेवाईकांचा सहभाग असल्याचा आरोप असून, त्यांची भूमिका पोलिसांकडून तपासली जात आहे.
या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू असून, उर्वरित आरोपींचा सहभाग आणि संपूर्ण घटनाक्रमाबाबत बोरिवली पोलीस पुढील तपास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.