Buldhana: ‘तक्रार घेण्यास टाळाटाळ?’ आदिवासी समाजाचा पोलीस ठाण्यात ठिय्या; नेमकं प्रकरण काय?

बुलढाण्यातील नागेशवाडी येथे आदिवासी युवकावर झालेल्या कथित हल्ल्याची तक्रार नोंदवून घेत नसल्याचा आरोप करत समाजबांधवांनी डोणगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. तक्रारीतील मुद्दे वगळल्याचा आरोपही करण्यात आला.
हल्ल्याला चार दिवस उलटले, तरी तक्रार दाखल नाही?
हल्ल्याला चार दिवस उलटले, तरी तक्रार दाखल नाही?

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील नागेशवाडी येथे आदिवासी युवकावर झालेल्या कथित हल्ल्याच्या प्रकरणावरून डोणगाव पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर लेखी तक्रार देऊनही ती नोंदवून घेतली जात नसल्याचा आरोप करत आदिवासी समाजातील महिला आणि पुरुषांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर रोजी नागेशवाडी येथे एका आदिवासी युवकावर काही युवकांनी घरात घुसून हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संबंधितांकडून पोलिसांकडे लेखी तक्रार देण्यात आली. मात्र, 26 सप्टेंबर उजाडल्यानंतरही तक्रार दाखल करून घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्याकडून लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडलं; पैठण तहसील कार्यालय परिसरात एसीबीची मोठी कारवाई

या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी सुमारे दहा वाजल्यापासून आदिवासी समाजातील नागरिकांनी डोणगाव पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. दिलेल्या लेखी तक्रारीतील मुद्द्यांनुसार गुन्ह्याची नोंद करण्याऐवजी पोलीस वेगळी हकीकत लिहून घेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तक्रारीतील काही मुद्दे वगळले जात असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले.

दरम्यान, पोलिसांकडून तक्रार नोंदवताना मनमानी केली जात असल्याचा आरोप आदिवासी समाज बांधवांनी केला आहे. संबंधित प्रकरणात आरोपींना वाचवण्यासाठी कोणाच्या तरी दबावाखाली पोलीस काम करत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. मात्र, या आरोपांबाबत पोलिसांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

हेही वाचा: Samruddhi Mahamarg Robbery: समृद्धी महामार्ग ठरतोय लूटमार्ग! बुलढाण्यात कांद्याने भरलेला ट्रक पळवला, चालकाला बेदम मारहाण

तक्रार नोंदवून घेऊन संबंधित घटनेची योग्य ती चौकशी करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. गेल्या अनेक तासांपासून ठिय्या सुरू असल्याने पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावाचे वातावरण असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणात पोलिसांकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते, तक्रारीतील आरोपांची नोंद कशी केली जाते आणि संबंधित युवकावर झालेल्या हल्ल्याची चौकशी कोणत्या दिशेने पुढे जाते, याकडे आता लक्ष लागले आहे. या घटनेबाबत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला असून, त्यांचा आक्रोश आणि मागण्या पाहता येणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version