विजय चिडे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या पाचोड परिसरात शेतातील पिकांची लागवड करण्यासाठी गेलेल्या एकट्या महिलेला अज्ञात चोरट्याने भरदिवसा चाकूचा धाक दाखवून तिचे हातपाय बांधून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाचोड खुर्द शिवारात सोमवारी दुपारी सव्वा एक वाजेच्या दरम्यान घटना घडली असून महिलेच्या अंगावरील एक ते सव्वा लाखांचे दागिने चोरट्याने लंपास केले. या घटनेमुळे पाचोडसह परिसरातील महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी सोमवारी उशिरापर्यंत महिलेने पाचोड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली नव्हती.
याविषयी अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द येथील आशा अरुण वाघ (वय ३२) या सोमवारी सकाळी दहा वाजता आपल्या स्वतःच्या शेतामध्ये कपाशीची लागवड करण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी एक ते सव्वा एक वाजेच्या दरम्यान त्या कपाशीची टुट लागवड करत असताना पाचोड-अंबड राज्य महामार्गाकडून अज्ञात तीन ते चार जण शेतात गेले व तुझ्याकडचे सोने दे असे म्हटले, तेव्हा आशा वाघ यांनी तुम्ही कोण आहे असं विचारलं असता. त्यातील दोघांनी त्यांना चापट, बुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर महिला आरडाओरडा करू लागल्यामुळे त्यातील एका चोरट्याने थेट धारदार चाकू काढून त्यांच्या गळ्याला लावून तू जर ओरडली तर तुला जीवे मारतो म्हणून पुन्हा मारहाण करून तिचे हात साडीच्या पदराने बांधले. यानंतर महिलेच्या अंगावरचे सर्व सोनं काढून त्या ठिकाणाहून धूम ठोकली. चोरट्यांकडून मारहाण झाल्यामुळे आशाबाई धास्तीने चक्कर येऊन जमिनीवर कोसळल्या. दहा-पंधरा मिनिटांनी आशाबाई उठून उभा राहून त्याठिकाणी आरडाओरडा करू लागल्या. तातडीने त्यांनी पाचोड -पैठण मार्गाकडे धाव घेतली आणि घडलेला संपूर्ण प्रकार गावातील नागरिकांना सांगितला. गावकऱ्यांनी तात्काळ चोट्यांचा शोध घेतला. तोपर्यंत चोरटे घटनास्थळावरून धूम ठोकून पसार झाले होते.
हेही वाचा : नागपूरच्या जुनी कामठीच्या पुलाचंही स्ट्रक्चरल ऑडिट होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आदेश
या घटनेने आशाबाई वाघ घाबरल्या असल्याने गावकऱ्यांनी त्यांना तातडीने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती बीट जमादार अण्णासाहेब गव्हाणे यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन संपूर्ण प्रकरणाची पाहणी केली करून चोरट्यांचा माग काढत शोध घेतला. भरदिवसा महिलेला लुटल्याची घटना घडली असल्यामुळे पाचोडसह परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. यातून महिला शहरातच काय तर ग्रामीण भागातही सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. या चोरांना पकडणे आता पोलिसांसमोर एक आव्हान निर्माण झालेले आहे. सदर महिलेने अद्याप याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.