Wednesday, February 18, 2026 05:33:00 PM

Accident News: काळजाचा ठोका चुकवणारा रिक्षा अपघात; दोघांचा मृत्यू, दोन तरुणी मृत्यूशी झुंजतायत

अपघाताची भीषणता इतकी होती की, रिक्षाचालक रईस हासिम शेख हे रिक्षाच्या मोडलेल्या लोखंडी सांगाड्यात वाईट रीतीने अडकले होते.

accident news काळजाचा ठोका चुकवणारा रिक्षा अपघात दोघांचा मृत्यू दोन तरुणी मृत्यूशी झुंजतायत

छत्रपती संभाजीनगर: शहरातील अहिल्यानगर रोडवर सोमवारी मध्यरात्री रक्ताचा थरार पाहायला मिळाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका रिक्षाला भीषण अपघात झाला असून, हा आघात इतका भीषण होता की लोखंडी रिक्षाचा अक्षरशः कागदासारखा चक्काचूर झाला आहे. सोमवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास जेव्हा संपूर्ण शहर झोपलेले होते, तेव्हा झालेल्या या अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेत रिक्षाचालकासह दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन तरुण मुली मृत्यूशी झुंज देत आहेत.

अग्निशमन दलाने कापले रिक्षेचे पत्रे

अपघाताची भीषणता इतकी होती की, रिक्षाचालक रईस हासिम शेख हे रिक्षेच्या मोडलेल्या लोखंडी सांगाड्यात वाईट रीतीने अडकले होते. 'काळाने घाला घातला' आणि रईस यांचा जागीच अंत झाला. घटनेची माहिती मिळताच पदमपुरा अग्निशमन केंद्राचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रिक्षेचे पत्रे कापून अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या भीषण अपघातात रईस शेख (वय 35, रा. रांजणगाव) आणि रुक्मिणी येणगे (वय 45) या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: Share Market Today: ट्रम्प यांचा 'कॉल' आणि मार्केटमध्ये 'हल्लाबोल'; ट्रम्प यांच्या एका सहीने भारतीय गुंतवणूकदारांची 'दिवाळी'

दोन तरुणी गंभीर जखमी; प्रकृती चिंताजनक

या अपघातात केवळ मृत्यूच नाही, तर दोन तरुणी गंभीर जखमा झाल्या आहेत. शीतल मोरे (वय 24) आणि पायल वरदे (वय 19) या दोन तरुणी या अपघातात गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. हे सर्व जण रांजणगाव येथील शिवनेरी कॉलनीतील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. रात्रीच्या शांततेत झालेल्या या अपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर आले होते.

अपघाताचे गूढ कायम

मध्यरात्रीच्या वेळी हा अपघात नेमका कशामुळे झाला, रिक्षाला दुसऱ्या एखाद्या वाहनाने धडक दिली की रिक्षावरील नियंत्रण सुटले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. रांजणगाव परिसरातील रहिवासी असलेल्या या प्रवाशांवर काळाने झडप घातल्याने संपूर्ण रांजणगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: BMC Announces Fines: आता रस्त्यावर थुंकल्यास पाकीट होणार रिकामं; मुंबई महापालिकेचे 'हे' नियम नक्की वाचा


सम्बन्धित सामग्री