पुणे: पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत आता वाढत चालली आहे. गेल्या पाच वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात 11 जणांनी जीव गमावला आहे. जांभूत आणि पिंपरखेड ही गावे बिबट्याच्या हल्ल्याचे केंद्र बनली आहेत. केवळ एका महिन्यात पिंपरखेडमध्ये 3 मृत्यू झाले आहेत. 13 वर्षीय रोहन बोंबे या मुलाचा बळी गेल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी थेट पुणे-नाशिक महामार्ग 5 तासांहून अधिक काळ रोखून धरला.
पुण्यात बिबट्याची दहशत प्रचंड वाढली असून पिंपरखेड गावातील नागरिकांचा संयम आता संपला आहे. नुकतच पिंपरखेडमध्ये एका महिन्यात तीन नागरिकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे, ज्यामुळे परिसरात प्रचंड संताप आहे. संतप्त नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्ग तब्बल 5 तासांहून अधिक काळ रोखून धरला. त्यांनी थेट पालकमंत्री अजित पवार किंवा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांचे म्हणणे ऐकावे अशी मागणी केली आहे.
शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना फोन लावला आणि नागरिकांचे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचवले. पण केवळ फोनवरील आश्वासनांनी ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. पालकमंत्री किंवा वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी, या मागणीवर नागरिक ठाम आहेत. परिसरातील आमदारांनीही येथे उपस्थित राहावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
हेही वाचा: Latur Crime : सरकारी नोकरीचे आमिष!; 34 विद्यार्थ्यांना तब्बल 28 लाखांचा गंडा, फसवणुकीचा आकडा कोट्यवधीत?
पिंपरखेड गावात रोहन बोंबेवर बिबट्याने हल्ला केला आणि हल्ला एवढा भीषण होता की, रोहनचा जागीच अंत झाला. रोहनचे वडील आणि मामा त्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी शेतात धावले, तेव्हा बिबट्या त्यांच्या अंगावर धावून गेला. अखेर, रोहनच्या मामाने भाच्याचा मृतदेह अंगावर टाकून घराकडे आणला. आपल्या मुलाला डोळ्यासमोर गमावल्याने रोहनचे वडील प्रशासनाकडे न्यायाची मागणी करत आहेत. या हल्ल्याच्या आठवड्याभरापूर्वीच पिंपरखेड येथे एका 6 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. या दुहेरी धक्क्यातून गावकरी सावरले नाहीत तोच हा तिसरा बळी गेल्याने संताप वाढला आहे.
वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांनी आता वनविभागाला थेट आव्हान दिले आहे. आम्हाला बिबट्याला मारण्याची परवानगी द्या अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांच्या हालचाली या भागात सुरू आहेत, पण वनविभागाकडून ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. रात्री घराबाहेर पडायलाही भीती वाटते आणि मुले शाळेत जाताना मनात धडधड असते. वनविभाग फक्त पिंजरे लावते, मात्र बिबट्याला पकडत नाही, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. यावर वनविभागाने स्पष्ट केले आहे की, बिबट्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे. पिंजरे बसवले असून तज्ज्ञांची टीम कार्यरत आहे. परंतु नागरिकांचा संताप आहेत. जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी देखील या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे.