Devendra Fadnavis: मालेगाव महानगरपालिकेतील टिपू सुलतानच्या फोटोवरून सुरू झालेल्या वादाने आता पेट घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. "टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना शिवरायांशी करणे हे निंदनीय असून, हे लांगूलचालनाचे टोक आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सपकाळांचा समाचार घेतला.
नेमका वाद काय?
मालेगावच्या नवनिर्वाचित उपमहापौर शान-ए-हिंद (समाजवादी पक्ष) यांनी आपल्या शासकीय दालनात टिपू सुलतानचे छायाचित्र लावले होते. याला हिंदुत्ववादी संघटना आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी तीव्र विरोध केल्यानंतर प्रशासनाने ते चित्र हटवले. मात्र, या वादात उडी घेत काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानला महाराजांच्या समकक्ष ठरवणारे विधान केले.
मुख्यमंत्र्यांचा घणाघात; "सपकाळ कोणता इतिहास शिकले?"
हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावर टीका करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले आणि मोगलांच्या जाचातून जनतेला मुक्त केले. दुसरीकडे, लाखो हिंदूंना संपवणाऱ्या टिपू सुलतानशी त्यांची तुलना करणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. काँग्रेसमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल, तर त्यांनी या विधानासाठी माफी मागावी आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. सपकाळ नेमक्या कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचे संशोधन करावे लागेल. हा नवा आणि चुकीचा इतिहास भारत कधीही खपवून घेणार नाही, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - Chhagan Bhujbal: 100 टक्के ठरलं! सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष, भुजबळांची स्पष्टोक्ती; विलीनीकरणाच्या मुद्द्याला मात्र बगल
हर्षवर्धन सपकाळ यांचे वादग्रस्त विधान
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी टिपू सुलतानचे समर्थन करताना म्हटले होते की, 'टिपू सुलतान हे इंग्रजांविरुद्ध लढणारे महान योद्धे आणि भारताचे भूमिपुत्र होते. त्यांचे शौर्य लक्षात घेता त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांदियाळीत आणि त्यांच्या समकक्ष पाहिले पाहिजे.' त्यांच्या याच विधानामुळे आता राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मालेगाव महापालिकेच्या नगरसेवक विभागाने नियमांचे उल्लंघन झाल्याचे सांगत उपमहापौरांच्या दालनातून टिपू सुलतानचा फोटो जप्त केला आहे. मात्र, या घटनेमुळे सुरू झालेली राजकीय ठिणगी आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'शिवराय विरुद्ध टिपू सुलतान' हा वाद महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठ्या संघर्षाचे कारण ठरण्याची शक्यता आहे.