Gokul Doodh Sangh: दिवाळीच्या तोंडावर गोकुळ दूध संघाच्या आर्थिक धोरणांविरोधात आज वातावरण चांगलेच तापले. गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयावर गुरुवारी दूध संस्था प्रतिनिधींनी मोठा मोर्चा काढत कपात झालेल्या 40 टक्के डीबेंचर रकमेच्या परतफेडीची मागणी केली. या वेळी कार्यालय परिसरात आंदोलक, पोलीस आणि गोकुळ प्रशासन यांच्यात तीव्र चकमकीचे दृश्य पाहायला मिळाले.
शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने
गोकुळ विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली शेकडो संस्था प्रतिनिधींनी आज मोर्चा काढला. आंदोलकांनी गाई-म्हशींसह कार्यालय परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी अडविल्याने चढाओढ सुरू झाली. या वेळी काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले.
डीबेंचर कपातीचा वाद काय आहे?
गोकुळ दूध संघ ग्रामीण दूध संस्थांकडून दरवर्षी दूध खरेदी करताना ठराविक नफ्याची रक्कम ‘डीबेंचर’ या नावाखाली राखून ठेवतो. ही रक्कम नंतर विकास प्रकल्पांसाठी वापरली जाते आणि संस्थांना व्याजही दिले जाते. पूर्वी 10 ते 15 टक्के इतकी कपात होत होती, परंतु यावर्षी थेट 40 टक्के रक्कम रोखण्यात आली, असा आरोप महाडिक यांनी केला.
हेही वाचा - BMC Diwali Bonus: दिवाळीपूर्वी BMC कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा
यामुळे दूध संस्थांच्या हातात दिवाळीपूर्वी बोनस वा फरक रक्कम देण्यासाठी निधीच उरला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गाईच्या दुधावर 1.45 आणि म्हशीच्या दुधावर 2.45 इतका फरक दिला असला तरी, मोठ्या प्रमाणातील डीबेंचर कपातीमुळे अनेक संस्थांना अडचणी येत आहेत.
हेही वाचा - ST Bus Reservation: दिवाळीच्या तोंडावर एसटी आरक्षण प्रणाली ठप्प! प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना
प्रशासनाकडून दुर्लक्ष
महिनाभर सुरू असलेल्या या प्रश्नाकडे गोकुळ प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप महाडिक यांनी केला. गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष हसन मुश्रीफ विदेश दौऱ्यावर असल्याने या विषयावर कोणताही निर्णय झाला नाही, हेही त्यांनी नमूद केले. आंदोलनानंतर माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले की, दोन दिवसांत दूध उत्पादकांना चांगली बातमी मिळेल. कपात झालेली डीबेंचर रक्कम परत देणे शक्य नसले तरी, दूध फरक वाढवून देण्याची तयारी गोकुळ प्रशासनाने दर्शवली आहे.