पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील काही भागात रविवारी रात्री भूकंपाचा धक्का जाणवला. तलासरी, धुंदलवाडी तसेच मोडगाव या परिसरात साधारण रात्री 10 वाजून 33 मिनिटांच्या सुमारास अचानक जोरदार हादरे जाणवल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. भूकंपाचा धक्का जाणवताच परिसरातील प्रत्येक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही नागरिक खबरदारी म्हणून घराबाहेर पडल्याचे ही सांगण्यात येच आहे. अचानक आलेल्या या हादऱ्यामुळे नागरिकांमध्ये काही वेळ गोंधळाचे वातावरण होते.
पालघरमध्ये अचानक भीतीचं वातावरण
मिळालेल्या माहितीनुसार, तलासरी, धुंदलवाडी आणि मोडगाव या परिसरात एकाच वेळी हादरे जाणवल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा धक्का नेमका किती तीव्र होता, त्याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. शिवाय केंद्रबिंदू नेमके कुठे होते आणि हादऱ्यांचा कमीत कमी कालावधी किती होता, याची सुद्धा माहिती अजून स्पष्ट झालेली नाही. संबंधित यंत्रणेकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच या परिसरातील भूकंपाची तीव्रता आणि केंद्रबिंदूबाबत स्पष्ट माहिती समजून येईल.
दरम्यान, या भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरात कोणतीही जीवितहानी झाली आहे का किंवा ग्रामस्थांच्या मालमत्तेचे नुकसात झाले आहे का, याबाबत सध्या अधिकृत माहिती उपलब्ध नाही. स्थानिक पातळीवर संबंधित परिस्थितीची माहिती घेतली जात आहे. रात्रीच्या वेळी अचानक झालेल्या या प्रकाराने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहेय नागरिकांकडून अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहावे तसेच कोणत्याही खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे सध्या आवाहन करण्यात येत आहे.