Saturday, June 14, 2025 04:12:55 AM

Charging Risk Alert: चार्जिंगनंतर चार्जर प्लगमध्ये ठेवणे ठरू शकते घातक! जाणून घ्या काय आहे धोका

मोबाईल चार्जर सतत सॉकेटमध्ये ठेवण्याची सवय आग, शॉर्टसर्किट, वीज अपव्यय आणि शॉकचा धोका वाढवते. योग्य काळजी घेतल्यास अपघात टाळता येतात व ऊर्जा वाचवता येते.

charging risk alert  चार्जिंगनंतर चार्जर प्लगमध्ये ठेवणे ठरू शकते घातक जाणून घ्या काय आहे धोका

Charging Risk Alert: आजच्या डिजिटल युगात मोबाईल, लॅपटॉप आणि स्मार्ट उपकरणे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहेत. मात्र या उपकरणांचा वापर करताना काही सवयी आपल्याला अनावधानाने आर्थिक व शारीरिक नुकसानात ढकलू शकतात. त्यातली एक सवय म्हणजे मोबाईल चार्ज झाल्यावर चार्जर तसाच सॉकेटमध्ये लावून ठेवणे. ही सवय किती धोकादायक आहे, हे पाहूया खालील मुद्द्यांतून.

आगीचा गंभीर धोका

चार्जर सतत सॉकेटमध्ये लावलेला असल्यास तो उष्णता निर्माण करू शकतो. विशेषतः जुने किंवा कमी दर्जाचे चार्जर जास्त तापत असतात. तापमान वाढल्यास त्यातून ठिणग्या निर्माण होऊ शकतात आणि यामुळे घरात आग लागण्याचा धोका संभवतो. यामुळे केवळ उपकरणच नव्हे, तर जीवितहानीचाही धोका निर्माण होतो.

विजेचा अपव्यय -ऊर्जा खर्चात वाढ

फोन चार्ज होत नसलातरीही प्लग-इन चार्जर थोडीफार वीज सतत वापरत असतो. एका अंदाजानुसार, वर्षभर चार्जर सॉकेटमध्ये ठेवल्यास सुमारे 1.5 किलोवॅट वीज वाया जाते. थोडासा वाटणारा हा वीज वापर, दरवर्षीच्या बिलात मोठा फरक घडवतो.

चार्जरच्या आयुष्यावर परिणाम

चार्जरचा वापर न करताही सतत वीजपुरवठा होत असल्यामुळे त्याच्या अंतर्गत भागांवर ताण येतो. यामुळे अडॅप्टर गरम होतो आणि काही वेळानंतर निकामी होऊ शकतो. या प्रकारामुळे चार्जरचे आयुष्य कमी होते आणि ते वारंवार बदलावे लागते.

शॉक लागण्याचा धोका

अनेकदा घरात अचानक वीज पुरवठा बंद झाला आणि पुन्हा सुरू झाला, तर सॉकेटमध्ये लावलेला चार्जर विजेचा धक्का सहन करू शकत नाही. यामुळे फटके बसण्याची शक्यता निर्माण होते, विशेषतः लहान मुले किंवा वृद्ध जर त्या सॉकेटजवळ असतील तर अधिक धोका असतो.

शॉर्ट सर्किटची शक्यता

सतत प्लगमध्ये राहिल्याने चार्जरच्या वायरिंगमध्ये बिघाड होण्याची शक्यता वाढते. हीच गोष्ट शॉर्ट सर्किटसारख्या गंभीर अपघातांना कारणीभूत ठरू शकते. या सवयीकडे दुर्लक्ष केल्यास घरात अचानक वीज गेली किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणं निकामी होण्याचे प्रसंग घडू शकतात.

सावधगिरीने वागा 

फोन चार्ज झाल्यावर लगेच चार्जर प्लगमधून काढा.

शक्यतो चांगल्या दर्जाचा ब्रँडेड चार्जर वापरा.

जुना, तुटका किंवा खूप तापणारा चार्जर बदलून टाका.

लहान मुलांच्या हातांपासून चार्जर आणि सॉकेट लांब ठेवा.

 

 

 

 


सम्बन्धित सामग्री