Thursday, July 17, 2025 01:46:01 AM

अंधेरी पूर्व भागातील महापालिका शाळेत शिकणाऱ्या 700 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

अंधेरी पूर्वेतील महापालिकेच्या धोकादायक इमारतीत 700 विद्यार्थी शिकत असून पालकांमध्ये भीती आहे. आमदार मुरजी पटेल यांनी पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी केली आहे.

अंधेरी पूर्व भागातील महापालिका शाळेत शिकणाऱ्या 700 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

अंधेरी: अंधेरी पूर्वेकडील महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या सुमारे 700 विद्यार्थ्यांचे जीव सध्या गंभीर धोक्यात आले आहेत. कारण, त्यांना जी इमारत शिक्षणासाठी दिली गेली आहे, ती इमारत साठ वर्षे जुनी असून सध्या ती अतिशय धोकादायक स्थितीत आहे. या शाळेच्या इमारतीच्या अनेक भिंतींना मोठे तडे गेले आहेत. इतकंच नाही तर इमारतीचा स्लॅबही कोसळलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना या धोकादायक इमारतीत बसवण्यात आलं, यामुळे पालकांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचं पालकांचं म्हणणं आहे. अशा असुरक्षित वातावरणात विद्यार्थ्यांना बसवून शिक्षण देणं हे केवळ गैरजबाबदारपणाचं लक्षण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: ‘लाडकी बहीण योजना’वर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; गौतमी पाटील आणि अण्णा नाईक मुख्य भूमिकेत

या पार्श्वभूमीवर अंधेरीचे आमदार मुरजी पटेल यांनी शाळेची पाहणी केली. त्यांनी स्वतः जाऊन इमारतीची अवस्था तपासली आणि महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या हलगर्जी कारभारावर जोरदार टीका केली. त्यांनी शाळेच्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट तात्काळ करण्याची मागणी केली आहे.

आमदार मुरजी पटेल यांनी याप्रकरणी लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करण्याची भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जावं, अशी मागणी सध्या परिसरातील नागरिक आणि पालक करत आहेत.

या संपूर्ण घटनेमुळे पालिकेच्या शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तातडीने निर्णय न घेतल्यास मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


सम्बन्धित सामग्री