Sunday, July 13, 2025 10:43:59 AM

‘लाडकी बहीण योजना’वर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; गौतमी पाटील आणि अण्णा नाईक मुख्य भूमिकेत

‘लाडकी बहीण’ हा सामाजिक संदेश देणारा सिनेमा महिलांच्या सक्षमीकरणाची प्रेरणादायी कथा सांगतो. गौतमी पाटील व अण्णा नाईक पहिल्यांदाच एकत्र, वास्तवदर्शी मांडणी आणि आशयघन विषय.

‘लाडकी बहीण योजना’वर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला गौतमी पाटील आणि अण्णा नाईक मुख्य भूमिकेत

महाराष्ट्र: महाराष्ट्र सरकारच्या महिलांसाठीच्या लोकप्रिय ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’वर आधारित एक प्रेरणादायी आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात खास गोष्ट म्हणजे तरुणांची लाडकी नृत्यांगणा गौतमी पाटील आणि अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहोचलेले ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अण्णा नाईक ही जोडी प्रथमच एकत्र येणार आहे.

या सिनेमाची कहाणी केवळ एका योजनेभोवती फिरणारी नाही, तर ती त्या योजनेमुळे बदललेले आयुष्य, महिला सक्षमीकरणाचा प्रवास आणि ग्रामीण भागातील वास्तव याचं वास्तवदर्शी चित्रण करणारी आहे. 'लाडकी बहीण योजना' ही राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना आर्थिक मदत देणारी योजना असून, दर महिन्याला दीड हजार रुपयांचा लाभ देऊन महिलांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणि आत्मभान निर्माण करण्याचा शासनाचा उद्देश आहे.

चित्रपटात गौतमी पाटील एका संघर्षमय जीवन जगणाऱ्या महिलेची भूमिका साकारते जी या योजनेच्या माध्यमातून आपलं आयुष्य उभं करते. तिच्या आयुष्यात येणारे अडथळे, समाजाचा दृष्टिकोन आणि ती त्यावर मिळवलेला विजय हे सर्व प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतील. तर अण्णा नाईक या कथेला बळ देणारी भूमिका साकारणार आहेत, ज्यामध्ये ते एका संवेदनशील आणि समाजाभिमुख व्यक्तीमत्वाची झलक दाखवतील.

हेही वाचा: नवी मुंबई वाशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस; शव गुंडाळण्यासाठी दोन हजारांची मागणी

या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत गणेश शिंदे, जे सामाजिक विषयांवर प्रभावी मांडणीसाठी ओळखले जातात. ओम साई सिने फिल्म आणि शुभम फिल्म प्रोडक्शन या बॅनरखाली हा चित्रपट तयार होत असून, शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील आणि अनिल वणवे हे निर्माते आहेत. पटकथा आणि संवाद लेखन शितल शिंदे यांनी केलं असून, चित्रपट वास्तव आणि भावना यांचा समतोल राखणारा असेल असं सांगितलं जातं आहे.

सातारा येथे या चित्रपटाचा शुभारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुहूर्त clap देत या प्रकल्पाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. सोबतच स्थानिक आमदार आणि जिल्हाधिकारी यांची उपस्थिती सुद्धा विशेष आकर्षण ठरली.

'लाडकी बहीण' सिनेमा केवळ मनोरंजन नाही, तर समाजप्रबोधनाचा एक प्रभावी प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील महिलांसाठी चालू असलेल्या या योजनेला प्रोत्साहन देणारा, आणि त्यामागचा उद्देश जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारा हा सिनेमा भविष्यातील अनेक चित्रपटांना प्रेरणा देणारा ठरू शकतो.


सम्बन्धित सामग्री