सिंधुदुर्ग : राजकारणात सध्या सुरु असलेल्या ‘राज-उद्धव एकत्र’ चर्चेवर आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. 'उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळणाऱ्या 60 ते 70 टक्के मतांमागे फतव्याचा प्रभाव असतो. जर राज ठाकरे यांना हे मान्य असेल, तर त्यावर आम्ही काय बोलणार?" असे म्हणत केसरकरांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार टोला लगावला आहे.
अलीकडेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावे, असे विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की, 'प्रथम काँग्रेससोबतची युती संपुष्टात यावी आणि मग ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रातील मराठी जनतेसाठी ते हिताचं ठरेल.' संजय राऊत यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना दीपक केसरकर यांनी संजय राऊतांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
'बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच काँग्रेससोबत तडजोड केली नाही. आज काँग्रेससोबत एकत्र येऊन शिवसेना (उबाठा) आपल्या मूळ विचारसरणीपासून दूर गेली आहे,' असेही केसरकर म्हणाले. त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे गटाच्या सध्याच्या राजकीय भूमिकेवर टीका केली.
हेही वाचा: मुंबई वाचवायची असेल तर ठाकरे बंधू एकत्र येतील; राऊतांचा स्फोटक दावा
राजकीय निवृत्तीवर युटर्न
केसरकर यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय निवृत्तीविषयी यूटर्न घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण लवकरच राजकीय निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र आता त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, 'मी ती गोष्ट गमतीने सांगितली होती. सध्या माझ्या अंगात अजूनही ताकद आहे. आमदारकी नसेल, तर राज्यसभा किंवा विधान परिषद अशी भूमिका मी नक्कीच पार पाडू शकतो.'
नव्या पिढीला संधी देण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे सांगत केसरकरांनी आपल्या राजकीय सक्रियतेचा पुनरुच्चार केला. 'युवकांना संधी मिळायला हवी, पण याचा अर्थ असा नाही की मी पूर्णपणे निवृत्त होणार आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
दीपक केसरकर यांचा हा यूटर्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. त्यांनी घेतलेली भूमिका आणि केलेली विधाने सत्ताधारी शिंदे गटाच्या धोरणांसह आगामी निवडणुकांसाठी कशी ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. शिवसेना शिंदे गटाच्या रणनीतीमध्ये त्यांची भूमिका कितपत महत्त्वाची राहते, यावरही लक्ष केंद्रित झाले आहे.