Farmer Loan Waiver : महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026’ अंतर्गत कर्जमाफीच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या टप्प्यात राज्यातील तब्बल 3.27 लाख पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर 3161 कोटी रुपयांची मदत थेट हस्तांतरित करण्यात आली आहे. राज्य सरकारने आतापर्यंत या कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून एकूण 15.86 लाख शेतकरी कर्जखात्यांमध्ये 13,276 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असून, संकटग्रस्त बळीराजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे.
दुष्काळग्रस्त भागांसाठी मदतीचा व्यापक आराखडा
राज्यात जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळामुळे सुरुवातीला वगळण्यात आलेल्या सर्व तालुक्यांचा आता दुष्काळी यादीत समावेश करण्यात आला आहे. शेतकर्यांवरील संकटाचे सावट लक्षात घेता सरकारने बँक कर्जवसुलीस पूर्णपणे स्थगिती दिली आहे. याशिवाय, नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त मदत निधी वितरित केला जाणार आहे. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असून, शेतीपंपांची वीजजोडणी खंडित न करण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणला देण्यात आले आहेत. तसेच वीजबिलात विशेष सवलत देऊन पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा – दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा; पीक कर्ज वसुलीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
रब्बी हंगामासाठी पीककर्ज पुरवठ्याचे निर्देश
खरीप हंगाम हाताचा गेल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये म्हणून बँकांनी तत्परतेने नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश प्रशासनाने बँकांना दिले आहेत. आगामी 2027 या वर्षातही ‘एल निनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे राज्य सरकारने आतापासूनच जलसंधारणाची कामे वेगाने हाती घेण्याचे नियोजन केले आहे. शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम आणि योग्य आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी सरकार विविध योजनांद्वारे उपाययोजना करत असून दुष्काळाची झळ कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.