गेल्या काही आठवड्यांपासून साखरेच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर ताण वाढला आहे. सणासुदीच्या तोंडावर साखर महागल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली असतानाच आता चहाच्या देखील दरात वाढ झाल्याचे समोर आले आहे. सकाळची सुरुवात असो किंवा कामाच्या धावपळीतला छोटासा ब्रेक चहाचा एक कप हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
मात्र आता साखरेच्या वाढत्या दरामुळे चहाचा गोडवा कायम ठेवताना चहावाल्यांच्या तोंडाला मात्र घाम फुटू लागला आहे. साखरेसोबतच दूध, चहापत्ती आणि गॅसच्या दरातही वाढ झाल्याने चहाचा कप महागला आहे. साखर दरवाढी अगोदर आठ रुपयांचा चहाचा कप आता दहा रुपये झाला आहे. याचा फटका थेट ग्राहक आणि छोट्या चहाच्या व्यवसायिकांना बसत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी चहाच्या टपऱ्या आणि हॉटेल व्यवसाय हे हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या भावात वाढ झाल्याने या छोट्या व्यावसायिकांचे गणित बिघडले आहे. एकीकडे दूध महाग झाला असतानाच चहापत्ती महाग झाली आहे. तर दुसरीकडे व्यावसायिक गॅसचा खर्च वाढलेला आणि आता साखरेचे वाढलेले भाव त्यामुळे एका कपामागे मिळणारा नफा दिवसेंदिवस कमी होत चालल्याची व्यथा चहा विक्रेते मांडत आहेत.
साखरेचे भाव इतके का वाढले?
जुलैच्या अखेरीस साखरेचा किरकोळ दर सुमारे 48 रुपयांच्या आसपास होता. मात्र, ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात तो 55 रुपयांहून अधिक प्रति किलोपर्यंत पोहोचला. या वाढीमुळे इथेनॉल उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात साखर वापरली जात असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, सरकारने हा दावा फेटाळून लावत इथेनॉलसाठी साखरेचा वापर पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या देशात तयार होणाऱ्या इथेनॉलपैकी मोठा हिस्सा हा धान्य, विशेषतः मक्यापासून तयार होत असल्याने साखरेवरील दबाव कमी झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे.