Friday, February 13, 2026 06:54:22 PM

Driving License Banned : काय राव...सलग पाच वेळा हे नियम मोडल्यावर RTO तुमचा सत्कार करेल का?; आता होणार थेट लायसन्सच जप्त

नव्या नियमानुसार RTO आणि DTO यांना थेट अधिकार देण्यात आले असून, रस्त्यावरील शिस्त वाढवणे हा उद्देश आहे.

driving license banned  काय रावसलग पाच वेळा हे नियम मोडल्यावर rto तुमचा सत्कार करेल का आता होणार थेट लायसन्सच जप्त

मुंबई: रस्त्यावरील शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आता 'बडगा' उगारला आहे. वाहन चालवताना वारंवार नियमांची पायमल्ली करणाऱ्या चालकांसाठी आता धोक्याची घंटा वाजली आहे. नव्या सुधारित नियमानुसार, एका वर्षात पाच किंवा त्याहून अधिक वेळा वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्यास संबंधिताचे वाहन चालक परवाना (Driving Licence) निलंबित किंवा रद्द करण्याची कठोर तरतूद करण्यात आली आहे. 'अति शहाणा त्याचा बैल रिकामा' या उक्तीप्रमाणे नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या चालकांना आता थेट घरचा रस्ता धरावा लागणार आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) आणि जिल्हा परिवहन अधिकारी (DTO) यांना या कारवाईचे सर्वाधिकार बहाल करण्यात आले आहेत. 1 जानेवारीपासून लागू होणाऱ्या या निर्णयानुसार, एका वर्षात पाच गुन्हे नोंदवले गेल्यास परवाना धोक्यात येईल. विशेष म्हणजे, यामध्ये केवळ गंभीर अपघातच नव्हे, तर हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे आणि ओव्हरलोडिंग यांसारख्या 'नेहमीच्या' चुकांचाही समावेश आहे.

हेही वाचा: Balasaheb Thackeray 100 Birth Anniversary : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शताब्दीपूर्ती! व्यंगचित्रकार ते हिंदुहृदयसम्राट; वाचा संपूर्ण प्रवास

या नव्या नियमावलीत पारदर्शकता जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परवाना रद्द किंवा निलंबित करण्यापूर्वी संबंधित वाहनचालकाला आपली बाजू मांडण्याची कायदेशीर संधी दिली जाईल. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार ही तरतूद करण्यात आली असली, तरी पाच गुन्ह्यांचा आकडा गाठल्यानंतर चालकाचा मार्ग खडतर होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ही गणना दरवर्षी नव्याने केली जाईल; मागील वर्षातील गुन्ह्यांचा भार पुढील वर्षाच्या खात्यावर जमा केला जाणार नाही.

या निर्णयावर तज्ज्ञांमध्ये मात्र मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, शिस्त लावण्यासाठी हे 'योग्य दिशेने पडलेले पाऊल' आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला या निर्णयाला 'कठोर आणि संकल्पनात्मकदृष्ट्या त्रुटीयुक्त' असेही संबोधले जात आहे. रस्त्यांची सदोष रचना, ठिकठिकाणी नसलेली वाहतूक चिन्हे आणि व्यवस्थेतील मूलभूत त्रुटी सुधरवण्याऐवजी केवळ चालकांवर कारवाईचा बडगा उगारणे कितपत योग्य, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

वाहतूक क्षेत्रातील जाणकारांच्या मते, केवळ दंडात्मक कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. "पाच वेळा चूक" म्हणजे तो चालक सराईतपणे नियम मोडत असल्याचे स्पष्ट होते, परंतु त्यामागे रस्त्यांवरील गोंधळ कारणीभूत आहे का, याचाही विचार होणे गरजेचे आहे. तथापि, सर्वसामान्य नागरिकांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. 'सावधानता बाळगा आणि शिस्त पाळा', अन्यथा तुमची गाडी रस्त्यावर धावण्यापूर्वीच तुमच्या खिशातले लायसन्स RTO च्या कपाटात बंद होईल.

हेही वाचा: रोखठोक आणि थेट...भल्याभल्यांना केवळ शब्दांनी घाम फोडणारी सिंहगर्जना!; शिवसेनाप्रमुखांची खणखणीत भाषणं, बाळासाहेब ठाकरेंची गाजलेली भाषणं


सम्बन्धित सामग्री