ठाणे: सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठा फायदा मिळणार आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची पहिली झलक जय महाराष्ट्र वृत्तनाहिनीवर पाहायला मिळाली आहे.
मागील अनेक महिन्यांपासून विद्युत वाहनांनी एक अमुलाग्र बदल घडवून आणला असून यामध्ये विद्युत मोटरसायकल, विद्युत बस, विद्युत कार यांचा समावेश असून आता शेतकऱ्यांनाही विद्युत ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठा फायदा होताना दिसून येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत या विद्युत ट्रॅक्टरचे उद्घाटन होणार असून येत्या काळात या ट्रॅक्टरचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचं कौस्तुभ धोंडे आणि अभिषेक शिंदे यांनी सांगितले. तर या ट्रॅक्टर खरेदीसाठी राज्य शासनाकडून दीड लाख, कृषी विभागाकडून एक लाख, तर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाकडून बिनव्याजी कर्ज देखील उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा: अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 'सह्याद्री'वर चहापान; विरोधक चहापानाला जाणार का?
इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
AutoNxt नावाच्या कंपनीने देशातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर AutoNxt X45 बाजारात आणला. या ट्रॅक्टरची सुरुवातीची किंमत 15 लाख रुपये आहे. मात्र, त्यात इलेक्ट्रिक वाहनांवरील अनुदानाचा समावेश नाही. यासाठी राज्यानुसार वेगवेगळे अनुदान असते. हा ट्रॅक्टर एका चार्जवर सुमारे 6 तास काम करतो. तसेच सिंगल फेज चार्जरने चार्ज केल्यावर ट्रॅक्टर 6 ते 8 तासात तर थ्री फेज चार्जरने तीन तासात ट्रॅक्टरचे चार्जिंग पूर्ण होऊ शकतो.
या ट्रॅक्टरमध्ये 32 किलोवॅट क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर आहे. त्याच वेळी, ते 45 एचपीची उर्जा निर्माण करू शकते. ट्रॅक्टरमध्ये 35KWHr क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. हा ट्रॅक्टर उच्च टॉर्क आणि तीव्र वेग देतो, असा दावा कंपनीकडून केला जात आहे. तसेच ते आवाजाशिवाय काम करू शकते.
शेतकऱ्यांसाठी काय फायदे आहेत?
डिझेल ट्रॅक्टरपेक्षा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर चालवायला खूपच स्वस्त आहेत. डिझेलच्या तुलनेत विजेच्या किमती कमी आहेत आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा देखभालीचा खर्चही कमी आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर प्रदूषणमुक्त असतात, ज्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी मदत होते. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टरपेक्षा खूपच कमी आवाज करतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना काम करणे सोपे होते आणि आसपासच्या लोकांना त्रास होत नाही. इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये जास्त टॉर्क असतो, त्यामुळे जड काम सहज करता येते. अनेक राज्य सरकारे इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी देतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करण्यात मदत होऊ शकते.