Sunday, June 15, 2025 11:42:19 AM

धक्कादायक प्रकार उघड ; शिर्डी संस्थानात कर्मचाऱ्यानेच केली लाखो रुपयांची चोरी

शिर्डी साईबाबा संस्थानातील कर्मचाऱ्याने पाचशे रुपयांच्या दानाच्या नोटांचे बंडल चोरल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये उघड, भाविकांत संताप, गुन्हा दाखल व बडतर्फीची प्रक्रिया सुरू.

धक्कादायक प्रकार उघड  शिर्डी संस्थानात कर्मचाऱ्यानेच केली लाखो रुपयांची चोरी

शिर्डी: साईबाबा संस्थानमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने लाखो रुपयांची रक्कम चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संस्थानच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या बाळासाहेब नारायण गोंदकर या कर्मचाऱ्याने दानाच्या नोटांची मोजणी करताना पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल चतुराईने लपवले आणि त्यानंतर ते चोरून नेले. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आली असून संस्थान प्रशासन आणि भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

ही चोरी 4, 8 आणि 11 एप्रिल 2025 रोजी घडली असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. दक्षिणा मोजणीदरम्यान गोंदकरने पाचशे रुपयांची बंडले लपवली. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता 16 एप्रिल रोजी झालेल्या नोटा मोजणीनंतर मोजणी मशीनमध्ये 46,500 रुपयांची रक्कम सापडली. यानंतर 25 एप्रिल रोजी 50,000 रुपयांचे आणखी एक बंडल मशीनमध्ये आढळून आले. सतत दोन वेळा नोटा सापडल्याने संशय वाढला आणि सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली.

हेही वाचा: हाके ओबीसी समाजाचा वापर स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी करत आहेत; सोमनाथ काशिद यांचा आरोप

फुटेज पाहिल्यानंतर गोंदकरने नोटांचे बंडल मांडीखाली, पँटमध्ये आणि मशीनच्या मागे लपवल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यानंतर ही बंडले त्याने पळवली. इतक्या मोठ्या श्रद्धास्थानात अशा प्रकारे कर्मचाऱ्याच्याच हातून दानाची चोरी होणे हे अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार शिर्डी पोलिस ठाण्यात बाळासाहेब गोंदकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच त्याच्यावर बडतर्फीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

साई संस्थान हे जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून दररोज कोट्यवधी रुपयांची दक्षिणा संस्थानात जमा होते. त्यामुळे या रकमेची सुरक्षितता, पारदर्शकता आणि योग्य व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, या प्रकारामुळे संस्थानच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ही घटना उघड झाल्यानंतर साईभक्तांमध्ये संताप व्यक्त होत असून अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी करण्यात येत आहे. संस्थान प्रशासनाने देखील यापुढे दान मोजणी प्रक्रिया अधिक कडक आणि सीसीटीव्ही निरीक्षणाखाली पार पडेल, असे स्पष्ट केले आहे.
 


सम्बन्धित सामग्री