मुंबई: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडन येथे पसार झाल्यानंतर त्याचा भाऊ सचिन घायवळ याला गृहराज्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने शस्त्र परवाना देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी हा शस्त्र परवाना नाकारल्यानंतरही गृहराज्यमंत्र्यांनी शस्त्र परवान्यासाठी मंजुरी दिल्यामुळे विरोधकांनी योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच मुख्यमंत्री फडणवीस हे नेहमीच योगेश कदम यांची पाठराखण करतात, असा आरोपही विरोधकांनी केला होता. यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
मुख्यमंत्री फडणवीस नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सचिन घायवळला दिलेल्या शस्त्र परवान्यासंदर्भात बोलताना, याबद्दल गृह राज्यमंत्र्यांनी एक सुनावणी घेतली होती. परंतु शस्त्र परवाना दिलाच गेला नाही. पोलीस आयुक्तांनी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. त्यामुळे परवाना दिला गेला नाही. परवाना दिला असता तर अशाप्रकारचा आरोप योग्य होता. पण परवाना दिलेला नाही असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
या प्रकरणावर स्वतः योगेश कदम यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. विरोधकांनी आरोप केल्यानंतर त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली. निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला पडताळणीनंतर शस्त्र परवाना देण्यात आल्याचे मंत्री योगेश कदम यांनी सांगितले होते.
हेही वाचा: Ajit Pawar on Navi Mumbai International Airport: 'आधी विमानतळ चालू होऊ द्या मग...', नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर अजित पवार काय बोलले?
योगेश कदमांची पोस्ट
"शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून, नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. म्हणूनच, सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे."
शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार यांनी योगेश कदम यांच्यावर आरोप केले आहेत. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला शस्त्रपरवाना मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे अभय असल्याने मंत्री कदम यांनी राज्यात थैमान घातले आहे. त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि न दिल्यास हकालपट्टी करावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केली. योगेश कदम यांची अनेक बेकायदेशीर कृत्ये पुराव्यांसह विधिमंडळात मांडल्यानंतरही मुख्यमंत्री प्रत्येकवेळी त्यांची पाठराखण करीत आहेत. त्यामुळे काहीही केले तरी चालते, आम्हाला अभय आहे, असा संदेश जातो. त्यामुळे कदम बिनधास्तपणे वाटेल तसे वागत असल्याचा आरोप परब यांनी केला होता.