सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर प्रकरणात राजकीय पातळीवरही हालचाली सुरू झाल्या असून, राज्याच्या मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पीडित डॉक्टरच्या कुटुंबियांना भेट देत त्यांचे सांत्वन केले. त्यांनी कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. येत्या काही तासांत पंकजा मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जलद आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्या करणार आहेत.
या दुर्दैवी घटनेनंतर पंकजा मुंडे सध्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे पीडितेच्या घरी पोहोचल्या. त्यांनी मृत डॉक्टरच्या पालकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. “ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. मुलगी गमावण्याचे दुःख कमी होणार नाही, पण तिच्या न्यायासाठी मी ठामपणे तुमच्या सोबत आहे. दोषींना शिक्षा होईपर्यंत मी शांत बसणार नाही,” असे आश्वासन त्यांनी कुटुंबाला दिले.
कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी साताराचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी थेट संपर्क साधून या प्रकरणाची जलद, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिले. याशिवाय, त्या स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटून तपासाला गती देण्याची आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलण्याची विनंती करणार आहेत.
या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी आणि तरुण डॉक्टरला न्याय मिळण्यासाठी आरोग्य क्षेत्रासह सर्वसामान्य जनतेतूनही तीव्र मागणी होत आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जबाबदार यंत्रणेला उत्तरदायी धरण्याची वेळ आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा: Satara Doctor Case : फलटण डॉक्टर अत्याचार प्रकरणात नवीन ट्विस्ट; आरोपी पीएसआय गोपाल बदने अखेर पोलिसांसमोर हजर