Monday, November 17, 2025 12:58:01 AM

Bacchu Kadu Protest : सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत बच्चू कडूंचा नागपूरला वेढा; हमीभावासाठी आक्रमक भूमिका

नागपूरमध्ये बच्चू कडूंचे कर्जमाफी आणि हमीभावासाठी आंदोलन तीव्र केल आहे, सरकारने आज निर्णय न घेतल्यास रेल्वे-विमानसेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सामील आहेत.

bacchu kadu protest  सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत बच्चू कडूंचा नागपूरला वेढा हमीभावासाठी आक्रमक भूमिका

नागपूर: शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी पुकारलेले आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरु ठेवले आहे. राज्य सरकारकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा कडूंचा इशारा आहे.

बच्चू कडू आज दुपारपासून ‘चक्काजाम’ आंदोलनाला सुरुवात करणार असून, “मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भेटायला वेळ देत नाहीत, मका-सोयाबीन-कापूस या पिकांसाठी कलेक्शन सेंटर उपलब्ध नाहीत, 20 टक्के बोनस, सरसकट कर्जमाफी आणि हमीभाव ही आमची मुख्य मागणी आहे. मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतात तर महाराष्ट्रात का नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कडू यांनी स्पष्ट चेतावणी दिली “आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत नागपूर सोडणार नाही. मग एक महिना लागो अथवा एक वर्ष!” त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या सुमारे दीड लाख शेतकरी आंदोलनात सहभागी आहेत आणि संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे निमंत्रण पाठविल्याची माहिती आहे. मात्र, त्या चर्चेत तथ्य नसल्याचा दावा करत कडूंनी हे निमंत्रण धुडकावून लावले आहे. त्यांनी राज्य सरकारला आज दुपारी 12 वाजेपर्यंत अल्टीमीटम देत म्हटले “दखल घेतली नाही, तर आम्ही रेल्वे आणि विमानसेवा बंद पाडू.”

दरम्यान, महाराष्ट्रभरातून शेतकऱ्यांचा या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सरसकट कर्जमाफीची मागणी सध्या जोर धरत असून शेतकरी नेते रवी तुपकर व राजू शेट्टी यांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला. आंदोलनामूळे नागपूर परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

आता मुख्यमंत्री फडणवीस या आंदोलनाला कसा प्रतिसाद देतात आणि काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: CNAP Service: अनोळखी कॉलचे टेन्शन जाणार, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले हे निर्देश


सम्बन्धित सामग्री