सिंधुदुर्गमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय आणि विकासात्मक घडामोडींवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट करत स्थानिक पातळीवरील प्रकल्पांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.
पाच वर्षांनी लोकप्रतिनिधींची निवड करण्याची संधी मतदारांना मिळत असते. मात्र प्रामाणिक, निष्ठावंत आणि जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडून देणे हे पूर्णपणे जनतेच्या हातात असते, असे मत वैभव नाईक यांनी व्यक्त केले.
हा तालुका पारंपरिकरित्या शिवसेनेचा (उद्धव बाळसाहेब ठाकरे गट) बालेकिल्ला राहिलेला असल्याचे सांगताना नाईक म्हणाले की, काही अपवाद वगळता या मतदारसंघातून सातत्याने शिवसेनेचाच आमदार निवडून येत होता. शिवसेनेतील फुटीनंतर राजकीय परिस्थिती बदलली आणि आमदार बदलले, मात्र येणाऱ्या काळात पुन्हा या मतदारसंघात शिवसेनेचाच आमदार निवडून येईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त करत त्यांनी अप्रत्यक्षपणे माजी मंत्री दीपक केसरकर यांना खुले आव्हान दिले आहे.
हेही वाचा: Scrap Dealer Returns Gold: 'आयुष्यात एवढं प्रामाणिक असावं...'; सोनं परत करणाऱ्या एका इमानदार भंगारवाल्याची गोष्ट वाचून तुम्हीही थक्क व्हाल
यासाठी लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेत तालुक्यातील मूलभूत समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या निवडणुकांच्या काळात मतदारसंघांमध्ये पैशांचे मोठ्या प्रमाणावर वाटप होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र भविष्यात मतदार अशा प्रवृत्तीला नाकारून प्रामाणिक कार्यकर्त्यांनाच संधी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात अनेक प्रलंबित विकासकामे पूर्ण झाली होती. मात्र सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात जलयुक्त शिवारसह अनेक योजना अपूर्ण असल्याचा आरोप करत या मुद्द्यांवर आवाज उठवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यंदा आंबा पिकाचे उत्पादन पाच टक्क्यांपर्यंतही झाले नसल्याने शेतकरी अडचणीत असून शासनाने तातडीने याची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रश्न अनेक असतात, मात्र त्या प्रश्नांसाठी जनतेसमोर ठामपणे उभे राहिल्यास जनता निश्चितपणे साथ देते आणि निवडूनही देते, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या वक्तव्याद्वारे वैभव नाईक यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री दीपक केसरकर यांना खुले आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून आता यावर दीपक केसरकर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Member of Parliament Dies: धक्कादायक! खासदारावर काळाचा घाला; फुटबॉल खेळताना मैदानातच झाला अकाली मृत्यू