मुंबई: लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या बाजारातून एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेले सोन्याचे दर अखेर घसरले असून, ग्राहकांना आता कमी दरात दागिने खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. बुधवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत घट झाली. प्रति ग्रॅम सोनं सुमारे 71 रुपयांनी आणि प्रतितोळा सोनं तब्बल 700 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे लग्नसराईत सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलरचा दर, व्याजदरांतील बदल आणि मध्य पूर्वेतील तणाव या सर्व घटकांमुळे सोन्याचे भाव सतत वाढले होते. परिणामी, ग्राहक खरेदीबाबत साशंक झाले होते. पण आता पुन्हा एकदा दरात घट झाल्याने बाजारात खरेदीची चैतन्याची लाट दिसत आहे. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सध्या हा योग्य काळ मानला जात आहे, कारण सध्याचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. आज भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,22,460 रुपये इतका आहे, जो मंगळवारी 1,23,170 रुपये होता. म्हणजेच एका दिवसात सोनं 710 रुपयांनी स्वस्त झालं आहे. 22 कॅरेट सोनं प्रति ग्रॅम 65 रुपयांनी आणि 18 कॅरेट सोनं 54 रुपयांनी घसरलं आहे. फक्त सोनंच नव्हे, तर चांदीच्या दरातही घट झाली आहे. काल बाजारात प्रति किलो चांदी 1,54,000 रुपये होती, तर आज ती 1,51,000 रुपयांवर आली आहे.
हेही वाचा: Abhimanyu Drone: आता शत्रूही घाबरेल! भारतीय नौदलाचा नवा प्रयोग; ‘अभिमन्यु’ ड्रोन मिग-29K व राफेल-M सोबत घेणार भरारी
जळगाव, मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशातील प्रमुख सराफा बाजारातही अशीच स्थिती दिसून आली. जळगावच्या बाजारात मंगळवारी सोने 515 रुपयांनी घसरून प्रतितोळा 1,24,218 रुपयांवर आले. मुंबई आणि पुण्यात सरासरी दर 1,24,300 ते 1,24,400 रुपयांच्या दरम्यान होता, तर दिल्ली बाजारात किंचित वाढ-घट पाहायला मिळाली. व्यापाऱ्यांच्या मते, ही घसरण तात्पुरती असली तरी लग्नसराईतील मागणी लक्षात घेता पुढील काही दिवसांत पुन्हा दर वाढू शकतात. यावर्षी एप्रिल महिन्यात सोन्याने 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता आणि दिवाळीच्या काळात 1,35,136 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते. त्याच काळात चांदीनेही 1,90,550 रुपये प्रति किलो असा विक्रम केला होता.
सध्या दर कमी झाले असले तरी, तज्ज्ञांचा अंदाज आहे की आगामी काळात पुन्हा सोन्याच्या किंमतीत तेजी येऊ शकते. सध्याच्या घसरणीमुळे लग्नसराईतील ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरली आहे. सराफा व्यापाऱ्यांचा सल्ला आहे की, ज्यांना लग्न वा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करायचं आहे, त्यांनी ही संधी हातची जाऊ देऊ नये, कारण पुढील आठवड्यांत बाजार पुन्हा वर जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
हेही वाचा: New York Mayor Election: चित्रपट निर्माती मीरा नायरचा मुलगा न्यूयॉर्कचा महापौर! जोहरान ममदानी कोण आहेत?