वाघांच्या भ्रमणमार्गावर वीजवाहिनीचे संकट; तब्बल 5,152 झाडांच्या कत्तलीस मंजुरी मिळताच वन्यजीवप्रेमींसह शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध

गोंदियाच्या तिरोडा उपकेंद्रापर्यंत 400 केव्ही क्षमतेची उच्च दाबाची वीजवाहिनी टाकण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मार्गातील तब्बल 5152 झाडे तोडण्याचा प्रस्ताव पुढे आला असून, राज्य वन्यजीव मंडळाने या वृक्षतोडीला मंजुरी दिल्याने खळबळ उडाली आहे.
electricity
electricity

Gondia Power Transmission Line Raipur to Tiroda: कर्जत येथील वीजप्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरून राज्यभरात आधीच संतापाचे वातावरण असताना, आता गोंदिया जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथील टीपीपी उपकेंद्रापासून गोंदियाच्या तिरोडा उपकेंद्रापर्यंत 400 केव्ही क्षमतेची उच्च दाबाची वीजवाहिनी टाकण्यात येणार आहे. अदानी पॉवर लिमिटेड कंपनीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मार्गातील तब्बल 5152 झाडे तोडण्याचा प्रस्ताव पुढे आला असून, राज्य वन्यजीव मंडळाने या वृक्षतोडीला मंजुरी दिल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवण्यात आला आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा भ्रमणमार्ग धोक्यात; वाघांच्या संचारावर परिणाम होण्याची भीती
ही प्रस्तावित वीजवाहिनी थेट महाराष्ट्रातील प्रसिद्ध नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या वन्यजीव भ्रमणमार्गातून (टायगर कॉरिडॉर) जाणार आहे. या संवेदनशील क्षेत्रात वाघांचा आणि इतर वन्यजीवांचा मोठा संचार असतो. वन्यजीवप्रेमींनी आणि तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या पट्ट्यातील हजारो झाडांची कत्तल केल्यास केवळ पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होणार नाही, तर वाघांच्या नैसर्गिक कॉरिडॉरमध्ये गंभीर अडथळे निर्माण होऊन त्यांच्या संचार व प्रजननावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा – दुष्काळाचे सावट, हलाखीची परिस्थिती; अकोल्यात आणखी एका शेतकऱ्याने जीवन संपवले, घटनेने खळबळ

शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार वीजवाहिनी; जमिनीचे दर गडगडण्याची भीती व्यक्त
केवळ वन्यजीवप्रेमीच नव्हे, तर स्थानिक शेतकरी वर्गातूनही या प्रकल्पाविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे. ही उच्च क्षमतेची वीजवाहिनी थेट शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरून नेण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. जमिनीवरून वीजवाहिनी गेल्यामुळे शेतजमिनींचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कमी होतील आणि भविष्यात शेती करताना कायदेशीर व तांत्रिक अडचणी निर्माण होतील, अशी भीती शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात वन्यजीव संरक्षक, पर्यावरणवादी आणि शेतकरी एकत्र येत तीव्र आंदोलनाची भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

प्रकल्पाविरोधात वन्यजीव संरक्षक, पर्यावरणवादी आणि शेतकरी एकत्र; संघर्षाची ठिणगी
या संपूर्ण वादानंतर जेव्हा तिरोडा येथील अदानी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीची वीजवाहिनी आणली जाणार असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. मात्र, या प्रकल्पाशी संबंधित अधिकृत व सविस्तर माहितीसाठी कंपनीच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले. एकंदरीतच, रायपूर ते तिरोडा दरम्यानच्या या उच्च दाबाच्या वीजवाहिनी प्रकल्पामुळे गोंदियाच्या राजकारणात आणि पर्यावरण वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राज्य वन्यजीव मंडळाने मंजुरी दिली असली, तरी केंद्रीय वन्यजीव मंडळाची अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वीच स्थानिक पातळीवर संघर्षाचे ढग दाटून आले आहेत. पर्यावरणाची हानी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळावे, यासाठी हा प्रकल्प अन्य मार्गाने न्यावा, अशी जोरदार मागणी आता जोर धरत आहे.

हेही वाचा – भाजपची मोठी खेळी! विधान परिषदेत ताकद वाढण्यासाठी मित्रपक्षाला धक्का; थेट आमदारचं…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version