BEST Launches New Electric Buses: मुंबईच्या हरित वाहतूक उपक्रमाला नवा वेग देत, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक उपक्रम (BEST) ने मंगळवारी 150 नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या मुंबईकरांच्या सेवेत आणल्या आहेत. या आधुनिक बसगाड्या पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि पर्यावरणपूरक असून, शहरातील सार्वजनिक वाहतूक नेटवर्क अधिक शाश्वत करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
दरम्यान, 12 मीटर लांबीच्या या बसगाड्या 'वेट लीज' मॉडेलवर चालवल्या जाणार आहेत, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यासह शहराच्या स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टांना बळकटी मिळणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या 150 इलेक्ट्रिक बसपैकी 115 बस PMI इलेक्ट्रो मोबिलिटी कंपनीच्या असून त्या मुंबादेवी मोबिलिटी प्रा. लि. यांच्या मार्फत चालवल्या जातील. तर उर्वरित 35 बस ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीच्या असून, त्या ईव्ही ट्रान्स महाराष्ट्र प्रा. लि. यांच्या ताब्यात असतील.
हेही वाचा - Marathi Films: मराठी चित्रपटांचे तिकीट दर आता 100 ते 150 रुपये होणार? मंत्रालयातील बैठकीनंतर सरकार लवकरच घेणार महत्त्वाचे निर्णय
प्रवाशांच्या सोयीसाठी या बसगाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बसेस मुंबईतील 21 मार्गांवर धावतील. या मार्गांमध्ये अंधेरी (प.), जोगेश्वरी (प.), कुर्ला (पूर्व आणि पश्चिम), वांद्रे (प.), कांदिवली (प.) आणि बोरिवली (प.) यांसारख्या प्रमुख उपनगरी स्थानकांचा समावेश आहे. या बसगाड्या मेट्रो लाईन्स 1, 2अ, 7 आणि 3 (अॅक्वा लाईन) शी देखील जोडल्या जाणार असल्याने मेट्रो प्रवाशांना अखंड ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ मिळेल.
हेही वाचा - वृक्षपुनर्रोपण ही 'बनावट प्रक्रिया'; 'जीएमएलआर'सह मेट्रो प्रकल्पांच्या वृक्षतोड परवानग्या रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा!
प्राप्त माहितीनुसार, या नव्या इलेक्ट्रिक बससेवेच्या माध्यमातून दररोज तब्बल 1.9 लाख मुंबईकरांना प्रदूषणमुक्त, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळेल. हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या शाश्वत शहरी गतिशीलतेच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. तसेच यामुळे राज्यातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांना बळकटी मिळणार आहे, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.