मुंबई: मुंबईकरांचा रोजचा पूर्व - पश्चिम प्रवास लवकरच इतिहासजमा होणार असून, वाहतूक कोंडीच्या विळख्यातून सुटका देणारा एक ‘गेमचेंजर’ प्रकल्प निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यासाठी तब्बल 1,293 कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. हा टप्पा पूर्ण होताच नाहूर ते ऐरोलीचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत पार करता येणार आहे.
नाहूर ते ऐरोली: सिग्नलमुक्त प्रवासाचे नवे पर्व
या प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात नाहूर ते ऐरोली दरम्यान 1.33 किलोमीटर लांबीचा अत्याधुनिक उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा पूल केवळ एक रस्ता नसून, मुंबई आणि ठाणे शहरांना जोडणारी अत्यंत प्रगत इंटरचेंज प्रणाली ठरणार आहे. ऐरोली येथे केबल-स्टेड तंत्रज्ञानाचा वापर करून हा पूल उभारला जाणार असून, त्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
75 मिनिटांचा प्रवास थेट 25 मिनिटांवर
सध्या गोरेगावहून मुलुंड किंवा ऐरोलीकडे जाण्यासाठी वाहनचालकांना जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड किंवा घोडबंदर रोडचा वापर करावा लागतो. यामुळे हा प्रवास 75 ते 90 मिनिटांचा होतो. मात्र, 12.2 किमी लांबीचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हाच प्रवास अवघ्या 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे. म्हणजेच दररोज जवळपास 50 मिनिटांची बचत होणार असून, इंधनाचा अपव्ययही लक्षणीयरीत्या कमी होईल. सुमारे 14,000 कोटी रुपयांचा हा संपूर्ण प्रकल्प मुंबईकरांच्या वेळेचा आणि पैशांची मोठी बचत करणारा ठरणार आहे.
हेही वाचा: Pradhan Mantri Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेत नवा बदल; 'या' तारखेनंतर जमीन खरेदी करणाऱ्यांना 2.5 लाख लाभ मिळणार नाही
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
चौथा टप्पा: नाहूर ते ऐरोली टोल नाक्यापर्यंतचा उड्डाणपूल आणि भव्य क्लोव्हरलीफ इंटरचेंज.
इंटरचेंज व्यवस्था: ठाणे - नाहूर, ऐरोली - ठाणे, मुंबई - ऐरोली आणि दक्षिण मुंबई - ऐरोली या चारही दिशांना सिग्नलमुक्त थेट कनेक्टिव्हिटी.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान: उद्यानाखालून 4.7 किलोमीटर लांबीचे जुळे बोगदे, पर्यावरणाची हानी टाळून उभारण्यात येत आहेत.
दिंडोशी उड्डाणपूल: 1.2 किलोमीटर लांबीच्या या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, मे 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता.
मुंबईच्या वाहतुकीचा खरा ‘गेमचेंजर’
या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे फिल्म सिटी परिसरात टीबीएम (Tunnel Boring Machine)द्वारे करण्यात येणारे बोगद्यांचे काम आणि मुलुंडमधील भव्य क्लोव्हरलीफ इंटरचेंज. हे इंटरचेंज केवळ स्थापत्यदृष्ट्या आकर्षक नसेल, तर नाहूर, ऐरोली, ठाणे आणि दक्षिण मुंबई यांना जलदगतीने जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
2028 पर्यंत पूर्णत्वाचे लक्ष्य
मुंबई महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी स्पष्ट वेळापत्रक आखले असून, सर्व टप्पे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या दिंडोशी परिसरातील कामांनी वेग घेतला असून, नव्या निविदेमुळे अंतिम टप्प्यालाही गती मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईची पूर्व - पश्चिम वाहतूक केवळ सुलभच होणार नाही, तर ती जागतिक दर्जाची ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा: Pune Crime News: 'माहेरून 25 लाख आण, नाहीतर...'; इंजिनियर सुनेचा अमानवीय छळ; पुण्यात सासू सासऱ्यांच्या छळाला कंटाळून विवाहितेनं संपवलं आयुष्य